घरमहाराष्ट्रएसटी कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर

एसटी कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर

Subscribe

एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून अचानक कामबंद आंदोलन सुरु केलं आहे. पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. अचानक काम बंद केल्याने सुट्टीवरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांचे मात्र मोठे हाल होण्याची शक्यता आहे. हा संप कोणत्याही संघटनेने पुकारलेला नसून कोणत्याही प्रकारचा संप नसल्याचा दावा मात्र एसटी प्रशासनाने केला आहे.

या जिल्ह्यांमध्ये संपाचा परिणाम
मुंबईतील परळ डेपोमध्येही एसटी संपाचा परिणाम दिसत आहे. अनेक बसेस डेपोत उभ्या आहेत. रायगड जिल्ह्यात एसटी कर्मचारी संघटनेच्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. कर्जत, माणगाव, उरण आगारातील एसटी सेवा ठप्प झाल्या असून जिल्ह्यातील एकूण तेरा संघटना संपामध्ये सहभागी घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी कर्मचारी संपावर गेले असून जिल्ह्यातील १०० टक्के कर्मचारी संपावर गेले आहेत. वस्तीच्या गाड्या डेपोत जमा आहेत. अहमदनगर जिल्हा आणि शहरातील एसटी बंद असून शहरातील तीन मुख्य बस स्थानकातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तारकपूर, माळीवाडा आणि स्वास्तिक चौकातील तसेच जिल्ह्यातील अकरा आगारातील वाहतूक बंद झाली आहे. नाशिक- महामार्ग बस स्थानकावर बस उभ्या राहिल्याचे चित्र दिसत आहे. बाहेरगावच्या मुक्कामी आलेल्या २० बस सकाळपासून निघाल्या आहेत, मात्र स्थानिक डेपोच्या बस या आगारात आल्याच नाहीत.

आमच्या प्रशासनाकडे कोणत्याही कामगार विभागाने संपाची नोटीस दिलेली नाही. हा संप बेकायदेशीर आहे. एसटी प्रशासन याबाबतचा अहवाल सादर करून संबंधितांवर कारवाई करेल
– दिवाकर रावते, राज्य परिवहन मंत्री 

- Advertisement -

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या

  • एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा
  • पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी
  • जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही, तोपर्यंत कर्मचारी, कामगारांना २५ टक्के हंगामी वाढ देण्यात यावी

एसटी गाड्या आणि कर्मचारी संख्या

- Advertisement -
  • राज्यात एसटीची कर्मचारी संख्या १ लाख २ हजार असून, एसटी बसची संख्या १७ हजार आहे
  • दररोज ७० लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात
  • एसटीच्या आगारांची संख्या २५८, विभागीय कार्यालयांची संख्या ३१ आहे

यापूर्वी दिवाळीत केला होता संप
पगार वाढीसंदर्भात गेल्या वर्षी ऐन दिवाळी सणादरम्यान राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी चार दिवस संप पुकारला होता. यामुळे राज्यातील लाखो प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. दिवाळी सणानिमित्त एसटीतून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ये जा असते. याच दरम्यान कर्मचाऱ्यांनी संप केल्याने प्रवाशांना ठिकठिकाणी खोळंबा झाला होता. परिणात एसटीच्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचा ३६ दिवसांचा पगार कापण्यात आला होता.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा इतिहास
याआधी १९७२ मध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा १२ दिवसांचा संप झाला होता. त्यावेळी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली होती. त्यानंतर १९९६, २००७ सालीही संप झाले होते. याशिवाय १७ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०१७ याकाळात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -