घरमहाराष्ट्रकणकवलीत विद्यार्थ्यांनी मौजमजेसाठी केली घरफोडी

कणकवलीत विद्यार्थ्यांनी मौजमजेसाठी केली घरफोडी

Subscribe

घरफोडी प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आरोपी अल्पवयिन असून ते शाळेत जातात. त्यांच्याकडून पोलिसांनी पैसे जप्त केले आहेत.

कणकवलीमध्ये विद्यार्थ्यांनी मौजमज्जा करण्यासाठी चक्क घरफोडी केल्याची घटना घडली आहे. कणकवली येथील प्रांत कार्यालयाच्या मागे दा. र दळवी यांच्या चाळीत राहणाऱ्या दिलीप मालवणकर यांच्या घरामध्ये चोरी झाली होती. घर फोडून चोरट्यांनी ३९ हजार ७०० रुपये लंपास केले होते. पोलिसांनी याप्रकरणाच्या तपासाला गती आणत आरोपींना बेड्या ठोकल्या. ज्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे ते तिघे जण ही अल्पवयीन आहेत. आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडून ३६ हजार रुपये जप्त केले आहेत. बाकीचे पैसे त्यांनी चायनीज जेवण आणि मौजमजेसाठी खर्च केले.

अशी घडली घटना

दिलीप मालवणकर कुटुंबियांसोबत ३ मार्चला दुपारनंतर महाशिवरात्रीच्या कार्यक्रमानिमित्त गारगोटी येथील गावी गेले होते. ५ मार्चला घरी परतल्यानंतर घरामध्ये चोरी झाल्याचे समोर आले. त्याच्या घराचे दरवाडे तोडून भिंतीला अडकविलेल्या पर्समधून १६ हजार, कपाटातून अडीच हजार, एका टेबलला असलेल्या कपाटातील वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले २ हजार आणि १८ हजार तसेच एका बॅगेत असलेले १२०० रुपये असे सगळे मिळून एकूण ३९ हजार ७०० रुपये चोरीस गेल्याचे समोर आले. घरात चोरी झाल्याचे पाहून त्यांना धक्का बसला त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

- Advertisement -

शाळकरी विद्यार्थ्यांनी केले कृत्य

मालवणकर यांच्या खोलीचे मागील दोन्ही दरवाजे फक्त दाब देऊन, ढकलून उघडणे सहज शक्य होते. साहजिकच ही घरफोडी माहितगारानेच केली असल्याचा मालवणकर यांना अंदाज असल्याने त्यांनी काही संशयितांची नावे पोलिसांकडे दिली. चाळीलगत सतत संशयास्पद वावर असणाऱ्या या तिन्ही मुलांबाबतही त्यांनी पोलिसांना सांगितले कारण यापूर्वीही त्यांच्या घरातून रक्कम चोरीला गेली होती. तेव्हाही याच मुलांवर त्यांचा संशय होता. मालवणकर यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी गुप्त माहितगारांद्वारे चौकशी सुरु केली. त्या चौकशीतून ही घरफोडी याच तीन मुलांनी केल्याचे निष्पन्न झाले. मात्र, परीक्षा सुरु असल्याने पोलिसांनी या मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले नव्हते. परिक्षा झाल्यानंतर त्यांनी त्यांना ताब्यात घेतले.

मौजमजेसाठी केली चोरी

पोलिसांनी या मुलांची चौकशी केली असता ही घरफोडी, मालवणकर यांची खोली बंद असल्याची संधी साधून भरदिवसाच केली असल्याची त्यांनी कबुली दिली. तसेच ही चोरी केवळ मौजमजेसाठी, पैसे मिळविण्याकरिता केली असल्याचे मुलांनी कबुल केले. ही मुले अल्पवयीन असल्याने त्या अनुषंगाने असणाऱ्या नियमानुसारच पुढील कार्यवाही होणार आहे. सध्या तिघांनाही त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दोषारोपत्र दाखल झाल्यानंतर तिघांनाही बाल न्यायालयात हजार करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -