घरमहाराष्ट्ररायगडमधून लोकसभेसाठी सुनील तटकरे पुन्हा मैदानात

रायगडमधून लोकसभेसाठी सुनील तटकरे पुन्हा मैदानात

Subscribe

गेल्या अनेक महिन्यांपासून रायगड जिल्ह्यात तळ ठोकून राहणार्‍या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना रायगड लोकसभा मतदार संघातून मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला. रायगड जिल्ह्यात तटकरे कुटुंबीयांचे वर्चस्व असल्याने त्यांच्यासमोर शिवसेनेचे विद्यमान केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे कडवे आव्हान असणार आहे. शिवसेनेचे विद्यमान केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी रायगड लोकसभा मतदार संघात तीनवेळा निवडणूक जिंकून हॅट्रिक केली आहे. मात्र, आता या मतदार संघात बदलाचे वारे सुरू झाले आहेत. याचाच फायदा घेत शरद पवार व अजित पवार यांनी अनेक वेळा या मतदार संघाचा दौरा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील तटकरेंच्या नावाला पसंती दिली असून केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या नावावरही शिवसेनेने शिक्कामोर्तब केले आहे. रायगड लोकसभा मतदार संघामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर हे दोन विधानसभा मतदारसंघ, तर रायगड जिल्ह्यातील महाड, श्रीवर्धन, अलिबाग, पेण हे चार विधानसभा मतदार संघ येतात. शेकापसोबत आघाडी झाल्यामुळे सुनील तटकरे यांना २०१४ पेक्षा आताची लढत अधिक सोपी वाटत आहे. २०१४ मध्ये केवळ दोन हजार मतांनी तटकरे यांना पराभव पत्करावा लागला होता.

- Advertisement -

या मतदार संघात राष्ट्रवादीचे भास्कर जाधव गुहागर, संजय कदम दापोली, अवधूत तटकरे श्रीवर्धन हे तीन राष्ट्रवादीचे आमदार आहेत, तर शेतकरी कामगार पक्षाचे पंडित पाटील अलिबाग, धैर्यशील पाटील पेण असे दोन आमदार आहेत. तर महाडमध्ये शिवसेनेचे एकमेव आमदार भरत गोगावले हे आहेत. शेतकरी कामगार पक्षाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली आघाडी हे शिवसेनेसमोर सर्वात मोठे आव्हान आहे. आपल्या ३० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत सुनील तटकरे यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, विधान परिषद अशा विविध पातळ्यांवर या वाटचालीत काम केले आहे. जिल्हा परिषदेचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यावेळी ते ओळखले गेले. राज्याच्या मंत्रिमंडळात अन्न नागरी पुरवठा, जलसंपदा, अर्थ व नियोजन यासारख्या हाय प्रोफाईल विभागांचा कार्यभार त्यांनी संभाळला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा अपवाद सोडला तर ते कधी अपयशी ठरले नाहीत. जलसंपदा मंत्रिपदाची कारकीर्द त्यांच्यासाठी काटेरी ठरली.

जलसंपदा विभागाच्या घोटाळ्यात त्यांच्यावर आरोप केले गेले. रायगड जिल्ह्यातील कोंढाणे आणि बाळगंगा धरणांच्या कामात प्रशासकीय अनियमितता करून धरणांच्या किमती करोडो रुपयांनी वाढवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. अनंत गीते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघात विजयाची हॅट्रिक केली आहे, तत्पूर्वी ते रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून दोनवेळा विजयी झाले आहेत. गीते यांनीही शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांच्यासोबतचे वैर संपुष्टात आणून, त्यांच्या खेडमधील मतांची बेरीज करण्याचा प्रयत्न केला आहे. दापोली विधानसभा मतदार संघात कदम यांचे पुत्र निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे दोघांमध्ये एकमेकांच्या मदतीचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. याचा फायदा गीतेंना काही प्रमाणात होईल.

- Advertisement -

अलिबाग रेल्वे, रोह्यापर्यंतची मेमू रेल्वे सेवा, महामार्गाचे चौपदरीकरण अशा विकास कामांच्या गणितावर गीते यांची मदार आहे. त्याचबरोबर कुणबी समाजाची वोट बँक आपल्यासोबत ठेवण्यासाठी गीतेंचा भर असणार आहे. गीते यांचे कट्टर समर्थक शिवसेनेचे रायगडचे माजी जिल्हा प्रमुख प्रकाश देसाईंना आपल्याकडे खेचून घेत सेनेला राष्ट्रवादीने धक्का दिला. तर दुसर्‍या बाजूला गीतेंनी तटकरेंचे कट्टर समर्थक रोह्याचे माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांना आपल्याकडे खेचत तटकरेंनाही धक्का दिला.

अलिबागमध्ये माजी आमदार मधुकर ठाकूर, पेणमध्ये माजी मंत्री रवी पाटील आणि महाडमध्ये माजी आमदार माणिक जगताप यांनी राष्ट्रवादी विधानसभेला आपल्याला मदत करतील, या भावनेतून काँग्रेसची रसद तटकरेंच्या मागे उभी केली. मात्र, विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसेने या तिघांनाही मदत केली नाही. यामुळे रवी पाटील भाजपत दाखल झाले आहेत, तर मधुकर ठाकूर तटकरेंना मदत करण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्यामुळे शेकापची मते वाढत असताना मात्र काँग्रेसची मते वजा होण्याची शक्यता आहे. काही बेरजा, काही वजाबाक्या असे संमिश्र चित्र निर्माण झाले आहे.

लोकसभा निवडणूक 2014
अनंत गीते (शिवसेना) – 3,96,178
सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 3,94,068

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -