सांगली हादरली! गोळ्या झाडूनही हल्लेखोरांचे समाधान नाही; दगडाने ठेचून केला गुंडाचा अंत

क्राइम
क्राइम

सांगली जिल्ह्यात एका गुंडाच्या हत्येने खळबळ माजवली आहे. येथील जत तालुक्यातील कंठी येथे पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या सराईत गुंडाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून आणि दगडाने ठेचून या गुंडाचा खात्मा केला आहे. काल, गुरुवारी मध्यरात्री हा भंयकर प्रकार घडला असून शुक्रवारी सकाळी उघडकीस आला आहे. धनाजी नामदेव मोटे (वय ४५, रा. कंठी) असे मृत गुंडाचे नाव असून घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. तसेच पोलीस त्या हल्लेखोरांचा शोध घेत असून खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सांगितले जात आहे.

काय आहे प्रकरण 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनाजी मोटे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होता. जत आणि सांगली शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर शस्त्र तस्करीसह जबरी मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास कंठी गावातील मरगुबाई मंदिराजवळ त्याचा मृतदेह आढळला. मतदेहाजवळ पिस्तुलाची काडतुसे, पुंगळ्या आणि रक्ताने माखलेले दगड पडले होते. काही अंतरावर मोटे याची दुचाकी पडली होती. हल्लेखोरांनी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोळ्या झाडून आणि दगडाने ठेचून त्याचा खून केला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

जतचे उपअधीक्षक रत्नाकर नवले आणि जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक उत्तम जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला. जत पोलिसांसह सांगली गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक हल्लेखोरांचा शोध घेत असून खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे निरीक्षक जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा –

Bhima Koregaon : हिंसाचार प्रकरणी आठ जणांविरोधात FIR दाखल; NIA ची कारवाई