घरमहाराष्ट्रयेवलेच्या पार्श्वभूमीवर चहा विक्रेते रडारवर

येवलेच्या पार्श्वभूमीवर चहा विक्रेते रडारवर

Subscribe

एफडीएकडून राबवण्यात येणार विशेष मोहीम

येवले चहामध्ये भेसळ असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर आता मुंबईसह राज्यातील चहाविक्रेत्यांवर एफडीएने आपली करडी नजर वळवली आहे. चहाविक्रेत्यांची पाहणी करण्यासाठी एफडीएकडून विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईतील चहाविक्रेत्यांवर कधीही धाड पडू शकते, असा इशारा एफडीएकडून देण्यात आला आहे. एफडीएच्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील चुनाभट्टी येथे धडक कारवाई करत एफडीएने तब्बल 510 किलोची चहापावडर जप्त केली आहे.

येवले अमृततुल्यकडून चहामध्ये मेलामाईन नावाचा घातक पदार्थ वापरण्यात येत असल्याचे सांगत एफडीएकडून कारवाई करण्यात आली होती. यावेळी प्रयोगशाळेत तपासासाठी पाठवलेल्या चहाच्या नमुन्यांमध्ये भेसळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये येवले चहाप्रमाणे सुरू करण्यात आलेल्या चहा स्टॉल, चहा विक्रेते यांच्यावर धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एफडीएकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत मुंबईतील 13 झोनमधील अधिकार्‍यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

- Advertisement -

हे अधिकारी आपापल्या झोनमधील चहाविक्रेत्यांवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. त्यानुसार एफडीएकडून चुनाभट्टी येथील मे.टी.डी. आय कॉर्पोरेशन या चहा विक्रेत्याच्या पेढीवर नुकतीच धाड टाकली. यामध्ये धनश्री हे चहाचे उत्पादन जप्त करण्यात आले. चहा पावडरमध्ये भेसळ असल्याच्या संशयावरून ‘धनश्री’चे तब्बल 510 किलो वजनाचा 89 हजार 760 किमतीचे उत्पादन जप्त करण्यात आले. या चहा पावडरमध्ये दोन प्रकारचे रंग वापरण्यात आले असून, त्याचे प्रमाण अधिक असल्याचा संशय वर्तवत चहा पावडर जप्त केली असल्याची माहिती एफडीएचे मुंबई विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांनी दिली.

चहा पावडरमध्ये रंग मिळण्यात येत अल्याने मुंबईतील चहाविक्रेत्यांवर बारीक लक्ष ठेवले आहे. त्यांची पाहणी करण्याची मोहीम एफडीएने हाती घेतली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये भेसळ करणार्‍या चहाविक्रेत्यांवर एफडीएची धाड पडू शकते.
– शशिकांत केकरे, सहआयुक्त (अन्न), एफडीए

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -