‘त्या संस्था चालकांवर गुन्हा दाखल करा; अन्यथा आमरण उपोषण करू’

सद्गुरु रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक व संचालक मंडळाने फसवणूक करून कुटुंबीयांचे भवितव्य देशोधडीला लावल्याचा आरोप करत त्यासंबंधी चौकशी करुन संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.

Ahmednagar
fraud
प्रातिनिधिक छायाचित्र

सद्गुरु रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक व संचालक मंडळाने फसवणूक करून कुटुंबीयांचे भवितव्य देशोधडीला लावल्याचा आरोप करत संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी संस्थेत चालू असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले.

केंद्रीय मानवाधिकार संगठनचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी शिक्षक आणि कर्मचार्‍यांना पाठिंबा देऊन आंदोलनात सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली. सद्गुरु रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान संस्थेच्या आश्रम शाळेत शिक्षक व शिक्षकेतर पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून प्रत्येकाकडून १० ते १२ लाख रुपये घेतले. संस्थेला अनुदान आल्यानंतर देखील कर्मचार्‍यांचे पगार रोखण्यात आले. याबाबत विचारणा करुन तक्रार केली असता संस्थेचे अध्यक्ष सुभाष बन्सी साळवे यांनी गैरवर्तनाच्या आरोपाखाली सर्वांना नोकरीवरुन काढले आहे. संस्थाचालकांनी आजतागायात नमूद शिक्षक आणि कर्मचार्‍यांकडून सुमारे १ कोटी, ३० लाख, ८२ हजार उकळले आहे. अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी नोकरीसाठी जमीन विकून, कर्ज काढून संस्थेला दिले आहेत. संस्थेला अनुदान प्राप्त होऊन देखील कर्मचार्‍यांना वेतन दिले जात नव्हते. या प्रकरणी तक्रार करूनदेखील समाजकल्याण विभागाने कसलीही दखल घेतलेली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. संस्थेचे संस्थापक भाजपचे शहर उपाध्यक्ष असल्याने राजकीय दबावाला बळी पडून शिक्षक व कर्मचार्‍यांवर अन्याय केला जात असल्याची भावना पिडीत शिक्षकांनी व्यक्त केली.

यासंबंधी पोलीसात देखील तक्रार करण्यात आली असून आरोपी फरार होऊ नये यासाठी तातडीने त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करुन अटक करावे, संस्थेच्या सर्व पदाधिकार्‍यांची तसेच सारिका इंटरप्राईजेसचे बँक खात्यांची चौकशी करावी. संस्था चालकांनी नोकरीवरुन काढल्याने सर्व शिक्षकांसह कर्मचार्‍यांचे भवितव्य टांगणीला लागले असून त्यांना परत नोकरीवर घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा २५ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण बसण्याचा इशारा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी दिला आहे.