घरमहाराष्ट्ररानसई धरणाचे प्लास्टर ढासळू लागले

रानसई धरणाचे प्लास्टर ढासळू लागले

Subscribe

नागरिकांवर भीतीचे सावट

तालुक्यातील औद्योगिक प्रकल्पांना, तसेच जनतेला पाणी पुरवठा करणार्‍या रानसई धरणाच्या संरक्षण भिंतीचे प्लास्टर ढासळू लागल्याने परिसरातील नागरिकांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) च्या अधिकार्‍यांनी या धरणाची पाहणी करावी आणि निकृष्ट दर्जाचे काम करणार्‍या ठेकेदारासह संबंधित अधिकार्‍यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

महाराष्ट्र शासनाने एमआयडीसीच्या माध्यमातून रानसई येथे हे धरण बांधले. यासाठी विंधणे, दिघोडे आणि चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील शेतकर्‍यांच्या जमिनी १९७० साली धरणाच्या उभारण्यासाठी संपादित केल्या. रानसई या आदिवासीवाडी जवळील डोंगर कपारीत १९७० ते ८० या कालावधीत २३६.७६ मीटर लांब व 14 मीटर खोली, तसेच १५ दरवाजे असणार्‍या पाणलोट क्षेत्रातील धरणाची संरक्षक भिंत उभी केली आहे. ३५० एकर क्षेत्रात हे धरण आहे. यात १० एम. सी. एम. (1 हजार कोटी लीटर) इतके पाणी साठवले जाते. नुकतेच हे धरण वाहू लागले आहे. मात्र तेथून वाहणार्‍या धारांमुळे धरणाला केलेले प्लास्टर ढासळू लागल्यामुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे.

- Advertisement -

धरणाचे प्लास्टरचे काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळेच हे प्लास्टर ढासळू लागले आहे. प्लास्टर ढासळल्याने धरणाच्या भिंतीच्या सळ्या, लोखंड बाहेर आले आहे. पावसाळ्यात या धरण परिसरात अनेक पर्यटक येत असतात. धरणातून पडणार्‍या उंच पाण्याच्या धारा अंगावर घेण्यासाठी तेथे पर्यटकांची झुंबड उडते. आता मात्र धारांसोबत प्लास्टरचे मोठाले तुकडे कोसळत असल्याने पर्यटकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करून धरणाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत तत्परता न दाखविल्यास तिवरे धरणाची पुनरावृत्ती अटळ असल्याचे मत ग्रामस्थ व पर्यटक व्यक्त करीत आहेत.

यासंदर्भात एमआयडीसीच्या पनवेल-उरण विभागाचे वरिष्ठ अभियंता सतीश पवार यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी रानसई धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील संरक्षण बंधार्‍याचे प्लास्टर पावसामुळे ढासळले असल्याचे सांगून ते पुन्हा एकदा दुरुस्त करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. सध्यातरी धरणाला कोणताही धोका नसल्याचे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -