घरमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाला पिंपरी-चिंचवड येथे जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे.

बीडमध्ये एका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवकाची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच आता पिंपरी-चिंचवड येथेही राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बू आसवानी यांनादेखील जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. डब्बू आसवानी यांना पिस्तूलाचा धाक दाखवत कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना पिंपरी-चिंचवड येथे घडली आहे. याप्रकरणी तीन संशयित आरोपींना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून इतर सात जण फरार आहेत. हा सर्व प्रकार मध्यरात्री नगरसेवक डब्बू आसवानी यांच्या नातेवाईकांच्या हॉटेलवर घडला आहे. दरम्यान, पिंपरी पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सनी सौदाई याचा वाढदिवस होता. त्यामुळे हॉटेल सलोनी येथे सनीसह भाऊ सचिन सौदाई, सुनील शर्मा, अजय टाक, तुषार दुलेकर, गोलू आणि इतर सात जण आले होते. ते उधारीवर बिअरची बॉटल मागत होते. यासंबंधी हॉटेल मालक आणि नातेवाईक राकेश यांनी नगरसेवक डब्बू आसवानी यांना फोन करून माहिती दिली. ते तातडीने हॉटेलवर मुलासह पोहचले. तेव्हा डब्बू आसवानी यांनी अगोदर पैसे द्या आणि माल घ्या असं सांगितलं. सनीसोबत असलेल्या अजय टाकने ‘आज सनी भाईचा वाढदिवस आहे, पैसे देणार नाही’, असे उलट उत्तर दिले. डब्बू आसवानी यांचा मोठा मुलगा अमित पुढे आला तेव्हा त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. भाषा नीट वापरा, असं अमित म्हणताच त्याच्या डोक्यात आरोपीने जग मारला. मुलाला मारताच नगरसेवक यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना आणि मुलाला आरोपीने बॉटल फेकून मारल्या. त्याचवेळी सचिन सौदाईसह ४ ते ५ जण हॉटेलच्या बाहेर लोखंडी कोयता आणि लाकडी दांडके घेऊन उभे होते. त्यामधील एकाने तुझी विकेट टाकतो म्हणत डब्बू आसवानी यांच्या डोक्याला पिस्तूल लावले. त्यांच्यात झटापट झाली आणि त्यांच्या मागील बाजूस लागले. तेवढ्यात एकाने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. डब्बू आसवानी यांनी आरडाओरडा केल्याने सर्व आरोपी पसार झाले. याप्रकरणी तिघांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपींवर अगोदर देखील गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. इतर सात जणांचा शोध पोलीस घेत आहे. दरम्यान, नगरसेवक डब्बू आसवानी यांनी दिलेल्या तक्रारीत बनाव तर नाही ना, याचादेखील शोध पोलीस घेत आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -