घरमहाराष्ट्रतिसर्‍या टप्प्यात गालबोट

तिसर्‍या टप्प्यात गालबोट

Subscribe

लोकसभा निवडणुकीतील तिसर्‍या टप्प्यासाठी मंगळवारी देशात आसाम, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, मणिपूर, ओदिशा, पुडूच्चेरी, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांत मंगळवारी एकूण ११७ मतदारसंघात मतदान झाले. १ हजार ६१२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदीस्त झाले. देशात सरासरी ६४.६६ टक्के, तर महाराष्ट्रात ६१.३० टक्के मतदान झाले.

तिसर्‍या टप्प्यातही ईव्हीएमचा घोळ दिसून आला. त्यामुळे अनेक ठिकाणी मतदानाचा वेळ वाया गेला. पश्चिम बंगालमध्ये मुर्शीदाबाद येथील राणीनगर भागातील मतदान केंद्र क्रमांक २७ आणि २८ जवळ काही अज्ञात लोकांनी हातबॉम्ब फेकला. तसेच बालीग्राम येथील मतदान केंद्रावर काँग्रेस व तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली, ज्यात एका मतदाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एका मतदाराचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अशा प्रकारे तिसर्‍या टप्प्याच्या मतदानाला हिंसाचाराचे गालबोट लागले. केरळमध्ये विविध मतदारसंघात ९ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील पुणे, मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात बोगस मतदान प्रकरणी गुन्हा दाखल झाला. बिबवेवाडी येथील २८७ क्रमांकाच्या बुथवर हा प्रकार घडला. महाबळेश्वरमधील तळदेव विवर येथील रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने येथील गावकर्‍यांनी व हरपवडे ( ता. पन्हाळा ) येथे धामणी प्रकल्पाच्या पुर्ततेसाठी विलंब होत असल्याच्या निषेधार्थ औरंगाबादच्या ग्रामस्थांनी रस्ते न झाल्याने मतदानावर बहिष्कार टाकला.

- Advertisement -

प. बंगालमध्ये हिंसाचार
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान अनुचित प्रकार घडल्याचे समोर आले. मुर्शीदाबाद येथील राणीनगर भागातील मतदान केंद्र क्रमांक २७ आणि २८ जवळ काही अज्ञात लोकांनी एक बॉम्ब फेकला. यात कोणतेही नुकसान झाले नसले तरी मतदारांना घाबरवण्यासाठी हा हल्ला केला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला. मुर्शीदाबाद येथील याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यानंतर मुर्शिदाबाद येथील आणखी एका घटनेमध्ये बालीग्राम येथील मतदान केंद्रावर काँग्रेस आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या भांडणात मतदानासाठी रांगेत उभ्या असलेला एक मतदार गंभीररित्या जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तसेच दक्षिण दीनापूर जिल्ह्यातील बुनियादपूर येथे एका पोलिंग एजंटचा मृतदेह आढळला.

केरळात ९ जणांचा मृत्यू
केरळमध्ये मतदानाच्या रांगेत उभे राहिलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या मतदार केंद्रांत तब्बल ९ जणांचा मृत्यू झाला. यात २ मतदान केंद्र अधिकार्‍यांचा समावेश आहे. कन्नूर, कोल्लम, परापुरम, फैझूमपरा, कासारगड या मतदारसंघांमध्ये मतदार बराच वेळ रांगेत उभे राहिल्याने, अतिउष्म्याचा त्रास झाल्याने तर काही जणांचा ह्रदयविकार, मधुमेहाचा त्रास बळावल्याने मृत्यू झाला. विशेष म्हणजे हे सर्व मतदार ज्येष्ठ नागरीक होते.

- Advertisement -

या दिग्गजांनी केले मतदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजप अध्यक्ष अमित शहा, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, भाजपचे लोकसभा उमेदवार जया प्रदा, काँग्रेस नेता हार्दिक पटेल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे,काँग्रेसचे उमेदवार शशि थरूर, ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, केरळ राज्याचे मुख्यमंत्री पी. विजयन, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार सुप्रिया सुळे यांनी मतदान केले.

औरंगाबादमध्ये‘लाइव्ह’ मतदान
मतदान केंद्रांमध्ये मोबाईल आणि इलेक्ट्रॉन यंत्र नेण्याची परवानगी नाही तो कायद्याने गुन्हा ठरतो. तरीही मंगळवारी औरंगाबाद येथे एका अज्ञात व्यक्तीने टीकटॉक अ‍ॅपवर मतदान प्रक्रियेचे लाईव्ह चित्रिकरण पोस्ट केले. त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईत झालेल्या एका सभेत सहायक पोलीस आयुक्त नरसिंग यादव यांचा सहभाग आढळून आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
आता महाराष्ट्रात अंतिम टप्पा सोमवारी २९ एप्रिलला होणार
तिसर्‍या टप्प्यातील मतदानात महाराष्ट्रात १४ जागांसाठी मतदान झाले मात्र बर्‍याच ठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी येत होत्या. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, भाजपचे गिरीष बापट, सुजय विखे-पाटील, उदयनराजे भोसले, निलेश राणे, भाजपचे रावसाहेब दानवे, अनंत गिते, सुनील तटकरे, राजू शेट्टी, चंद्रकांत खैरे या दिग्गजांचे, तर देशात भाजपचे अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंग यादव, काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे शशी थरूर, भाजपचे वरुण गांधी, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंदिस्त झाले. मंगळवारी देशात ११७ जागांवर १,६१२ उमेदवार रिंगणात होते तर महाराष्ट्रातील १४ मतदारसंघात २४९ उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -