घरमहाराष्ट्रपर्यावरणासाठी खारीचा वाटा उचलतोय एक अवलिया...

पर्यावरणासाठी खारीचा वाटा उचलतोय एक अवलिया…

Subscribe

सध्या वृक्ष लागवडीचा धुमधडाका सर्वत्र सुरू आहे. मात्र लावलेल्या रोपट्याकडे पुन्हा लक्ष देण्याची गरजच काय, अशी अनेकांची काहीशी मानसिकता असल्याने लावलेल्यापैकी किती रोपं जगली, हा संशोधनाचा विषय असतो. परंतु यालाही छेद देणारी काही माणसे असून, त्यापैकी आहे विभागातील वेलशेत गावातील एक अवलिया पुंडलिक ताडकर! दर वाढदिवशी विविध जातीची झाडे लावून न थांबता पुढे त्यांचे संगोपन करून ती मोठी होईपर्यंत देखभाल करण्याचे काम ते करतात.

आयपीसीएल प्रकल्पग्रस्त असल्याने ते याच कंपनीत सुरूवातीपासून नोकरी करीत आहेत. नोकरीचा व्याप सांभाळून झाडांचे संगोपन करण्याचा छंद त्यांना जडला आहे. गावाचे पुनवर्सन झाल्यानंतर त्यांनी मिळालेल्या वीस गुंठे जागेत घराच्या चारही बाजूला नारळ, कोकम, फणस, रंगीत चाफा, जांभूळ, बकूळ, काजू, पेरू, चिकू, लिंबू अशी विविध वृक्षराजीच तयार केली आहे. या झाडांमुळे आपल्या घरावर कायम सावलीच असते व हे करण्यासाठी स्वतः वीस वर्षे मेहनत घेतल्याचे ते अभिमानाने सांगतात.

- Advertisement -

आपल्या घरापुरतेच न थांबता ताडकर गेल्या पाच वर्षांपासून आपला वाढदिवस गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांसमवेत साजरा करतात. दोन्ही शाळांमध्ये प्रत्येकी एक तास विद्यार्थ्यांच्या सहवासात व्यतीत करताना आध्यात्मिक, आधुनिक, प्राचीन-अर्वाचिन विषय, अंधश्रद्धा, मराठी माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व, शिक्षक व वडीलधारी मंडळी करीत असलेले मार्गदर्शन व त्यातून मिळणारे फायदे यावर प्रश्नोत्तराद्वारे संवाद साधत असतात. मात्र या दिवशी शाळेच्या आवारात मुलांच्याच हस्ते झाडे लावायला ते विसरत नाहीत.

लावलेल्या रोपाकडे आपले, तसेच विद्यार्थ्यांचे कायम लक्ष असते व ज्या कलमाचे मुलांनी व्यवस्थित संगोपन करून वाढविले असेल त्यांना प्रोत्साहनात्मक बक्षीस म्हणून एक हजार रुपये त्यांच्या शाळेतच प्रदान करीत असतो, असे त्यांनी सांगितले. पाच वर्षांपूर्वी याच शाळांच्या आवारात लावलेले बाभूळ, वड, करंज आदी वृक्ष आज मोठे झाले आहेत. त्याचे निश्चितच समाधान वाटत असल्याचे ते म्हणाले. नोकरीबरोबरच गद्य-पद्य लेखन, विविध प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये निःशुल्क सूत्रसंचालन, विडंबनात्मक शाहिरी कार्यक्रमही ते करतात. बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत असल्यामुळे त्याच्या संतुलनासाठी खारीचा वाटा उचलत वृक्ष लागवडीस संगोपनाचा आपला अट्टाहास असल्याचे ताडकर यांनी शेवटी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -