घरमहाराष्ट्रखुशखबर! तुळशी तलाव भरून वाहू लागला

खुशखबर! तुळशी तलाव भरून वाहू लागला

Subscribe

यंदा मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून अवघ्या २० दिवसांतच मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळशी तलाव तुडूंब भरले आहे. पावसाच्या संततधारेमुळे मुंबईत ५४ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

संततधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एक असलेला तुळशी तलाव भरून ओसंडून वाहत आहे. मुंबई आणि उपनगरांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुळशी तलावात मात्र वाढ झाली आहे. हा तलाव तुडुंब भरला असून सोमवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून हा तलाव ओसंडून वाहू लागल्याची माहिती पालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आली आहे. गेल्या वर्षी हा तलाव १४ ऑगस्ट रोजी भरला होता. यंदा जून आणि जुलै महिन्यातही दमदार पाऊस झाल्याने एक महिना आधीच तुळशी तलाव भरला आहे.

५४ टक्के पाऊस पडला

यंदाच्या मान्सूनमध्ये ५४ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून मागील २० दिवसांच्या पावसांची नोंद घेत ही सरासरी टक्केवारी हवामान खात्याने दिली आहे. सध्याच्या स्थितीत शहरामध्ये एकत्रित केलेले पावसाचे पाणी अंदाजे ३७ हजार ५५० दशलक्ष लीटर इतके असून हे तुळशी आणि विहार तलावात झालेल्या ३५ हजार ७४४ दशलक्ष लीटरच्या साठवणी क्षमतेच्या बरोबरी इतके आहे. यंदाच्या पावसाळ्यात १०० टक्के सरासरी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार ५४ टक्के म्हणजे अर्ध्याहून अधिक पाऊस पडल्याची माहिती समोर येत आहे.

ठळक मुद्दे 

  • तुळशी हा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक तलाव आहे
  • मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा या सात तलावांमधून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो
  • सुमारे सव्वा कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईकरांच्या पाण्याची सोय या तलावांमधून होते
  • तुळशी आणि विहार हे दोन्ही तलाव मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आहेत
  • मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये सोमवारपर्यंत ५.५० लाख दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा झाला आहे
  • मुंबईला वर्षभरासाठीचा पुरेसा पाणी पुरवठा होण्याकरता तलावांमध्ये १४ लाख दशलक्ष लीटर्सच्यावर पाणीसाठा होणे आवश्यक आहे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -