गटाराच्या सांडपाण्यातून जा-ये थांबली

सरपंचांची कर्तव्य तत्परता

शहरातील पूर्व भागातील निर्माण नगरी परिसरात लगतच्या रेल्वे स्थानकाकडे जाणार्‍या रस्त्यावरील तुंबलेल्या गटारातून दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर आल्यामुळे ते पाणी तुडवत पादचार्‍यांना जा-ये करावी लागत होती. परिणामी वाढलेल्या नाराजीची दखल घेत सरपंच जान्हवी साळुंके यांनी कर्तव्य तत्परता दाखवत गटारमुक्त रस्ता तयार करून घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे.

ही नगरी उभी राहिल्यानंतर मोठ्या प्रमाणात येथे नागरिकीकरण झाले आहे. आजही अनेक गृहनिर्माण प्रकल्प आणि इमारती या भागात नव्याने उभ्या राहत आहेत. मात्र नागरिकीकरणाच्या तुलनेत या भागात नियोजनाचा अभाव आजही कायम आहे. त्यामुळे पावसाळ्यात अनेक भागात पाणी साचत असल्याने ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचते. परिणामी या भागातील रहिवाशांना साचणार्‍या डबक्यातील डासांनाही सामोरे जावे लागते. त्याचवेळी सांडपाणी तळे करून राहत असल्याने दुर्गंधीही चार-पाच महिने पिच्छा सोडत नाही. त्यात या ठिकाणी इमारती बांधणारे बिल्डर गायब झाले असून, सुविधा अर्धवट दिल्याने रहिवासी हैराण आहेत. त्यात भर म्हणून आता या रहिवासी भागातली सांडपाणी आणि मलमूत्र वाहून नेणारी गटारे तुंबली असल्याने गटाराचे पाणी निर्माण नगरीतून रेल्वे स्थानकाकडे जाणार्‍या रस्त्यावर येत होते.

या रस्त्याला गटाराचे स्वरुप प्राप्त झाले असल्याने त्यातून वाट काढताना पादचार्‍यांना कसरत करावी लागत होती, तर परिसरात असणार्‍या कार्यालय, दुकानांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. गटाराचे पाणी अधिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत असल्याने निर्माण नगरी, गंगानगर, हुतात्मा हिराजी पाटील नगर या भागातून रेल्वे स्थानकात येणार्‍यांना मलमूत्र मिश्रित पाण्यातून वाट काढावी लागत होती. ही व्यथा लक्षात घेऊन सरपंच साळुंके यांनी गटार मोकळे करून घेतले.

निर्माण नगरी भागात बिल्डरने इमारत बांधताना नियोजन केलेले नाही. या ठिकाणची गटारे देखील लहान स्वरुपाची आहे. त्यात मध्य रेल्वेने गंगानगर भागातील नाला बंद केल्याने तो निर्माण नगरी भागात उलटला होता. त्यामुळे गटाराचे पाणी रस्त्यावर आले होते.
-जान्हवी साळुंके, सरपंच