तलवार काढणार कुणावर ? : भुजबळांचा राजेंना टोला

आरक्षणप्रश्नी राजकारण नको , शब्दांची खणाखणी थांबवली पाहीजे

राजे सर्व जनतेचे असतात, रयतेचे असतात, एका समाजाचे नाही. सर्व समाजाचा विचार राजांनी करावा. आता संभाजीराजे तलवारीचा वापर ओबीसी वर करतात का अजून कोणावर करतात ते बघावे लागेल, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी खासदार संभाजीराजे छत्रपतींना लगावला आहे. आता शाब्दिक वाद थांबवावे, असे मत देखील भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले.

मराठा आरक्षणावर राज्यात वातावरण चांगल तापले आहे. आमचा संयम तोडायला लावू नका अन्यथा आम्ही तलवारी सुद्धा हातात घेऊ’, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला दिला. तर दुसरीकडे आरक्षणाच्या मुददयावरून खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. याबाबत बोलतांना भुजबळ म्हणाले, मराठा, ओबीसी अशी भांडणं आता थांबवायला हवी. आता चर्चा बरीच झाली. सर्वांनी विचारपूर्वक बोलले पाहीजे. राजे हे सर्व जनतेचे असतात, त्यांनी सर्वांचा विचार करायला पाहीजे. वडेट्टीवार इतर मागासवर्ग खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे त्यांना बोलणे भाग आहे परंतु सर्वांनीचा शब्दांवर बंधने घालायला हवीत सुशांत सिंग राजपूत प्रकरण संपत आलेल आहे त्यामुळे काही करून काही झाले पाहीजे असा काहींचा प्रयत्न आहे. आपले राजकारण करण्यासाठी काहीजण असा प्रयत्न करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. परंतू सर्वांनी बोलण्यावर बंधने घातली पाहीजेत. राज्यातील वातावरण बिघणार नाही याकरीता तलवारी नाही शब्दांची खणाखणी थांबवा असेही भुजबळ म्हणाले. एमपीएससी परिक्षांसंदर्भात कोरोनाच्या पार्श्वभूमीचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे. आपल्याला राज्यात आता हळू हळू सर्व खुले करायचे आहे. परिस्थिती बघून समिती याबाबत निर्णय घेईल असे ते म्हणाले.

महाराष्ट्रावर दुजाभाव का ?
केंद्र सरकारनं दक्षिण भारतातील कांद्याला निर्यात परवानगी दिली आणि महाराष्ट्राला नाही, हा दुजाभाव का? असा सवाल देखील भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला. मात्र, यामुळे भाव स्थिर राहायला मदत होईल. परंतु याबाबत संबधित मंत्र्यांना याबाबत निश्चित विचारणा करू असेही ते म्हणाले.

कर्जत येथील रस्ते दुरावस्थेबाबत भाजप आमदार गोपीपाथ पडळकर यांनी आमदार रोहीत पवार यांच्यावर निशाणा साधतांना शरद पवारांच्या खांद्यावरून खाली उतरा अशा शब्दात टिका केली होती. याबाबत बोलतांना भुजबळ म्हणाले, कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या ७ महीन्यांपासून विकास कामे ठप्प आहे. केंद्रानेही राज्याला पैसे दिलेले नाही त्यामुळे केवळ राज्य सरकारवर खापरं फोडणे योग्य होणार नाही. हळूहळू सर्व सुरू होईल त्यामुळे सरकारकडेही महसूल जमा होईल त्या माध्यमातून कामेही मार्गी लागतील. पडळकरांनीही मागच्या सरकारमध्ये काम केले आहे त्यामुळे उगाच आरोप करण्यात तथ्य नसल्याचे ते म्हणाले.