देशविरोधी घोषणा देणार्‍यांना तुरुंगात टाकणार -अमित शहा

home ministry announced top 10 dangerous terrorist list
अमित शहा

जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा देणार्‍यांना तुरुंगात टाकण्यात येईल, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे. जबलपूरमधील एका जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी अमित शहा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीकाही केली.

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ भाजप अध्यक्ष अमित शहा यांची जाहीर सभा झाली. त्यात अमित शहा म्हणाले की,जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा देणार्‍यांना तुरुंगात टाकायला हवं की नको? राष्ट्रविरोधी घोषणा देणार्‍यांना नक्कीच तुरुंगात टाकले जाईल.

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देशविरोधी घोषणा देणार्‍यांना वाचवायचा प्रयत्न करत आहेत. ते देशविरोधी कृत्य आहे.कितीही विरोध करा, पण आम्ही सर्वांना नागरिकत्व देणार आहोत. भारतावर जितका अधिकार माझा आणि तुमचा आहे, तितकाच अधिकार पाकिस्तानमधून आलेल्या शरणार्थींचा आहे. आज काँग्रेस नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करत आहेत.

राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांना आव्हान देतो की, त्यांनी या कायद्यात नागरिकत्व हिरावून घेणारी एखादी तरतूद तरी आहे का, हे शोधून दाखवावे. हा कायदा नागरिकत्व देणारा आहे, नागरिकत्व हिरावून घेणारा नाही. व्होटबँकेच्या राजकारणामुळे हे सर्व विरोधक पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, असेही शहा म्हणाले. शहा यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा, कलम ३७० रद्द करणे, एनआरसी आदी मुद्यांवरून विरोधकांना लक्ष्य केले. जेएनयूमधील आंदोलनावरही शहा यांनी भाष्य केले.