घरमहाराष्ट्रपवारांचा फोन न घेणारे जगनमोहन रेड्डी मोदींच्या भेटीला

पवारांचा फोन न घेणारे जगनमोहन रेड्डी मोदींच्या भेटीला

Subscribe

वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी आज दिल्ली येथे नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. भाजपने देशभरात काँग्रेस पक्षाचे पानिपत केले तर जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाने आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टीला धूळ चारली. २३ मे रोजी निकाल लागण्याच्या अगोदर चंद्राबाबू नायडू आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे तिसऱ्या आघाडीसाठी प्रादेशिक पक्षांची जुळवाजुळव करत होते. त्याच संदर्भात पवार यांनी जगनमोहन यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता. मात्र जगनमोहन रेड्डी यांनी पवारांशी बोलणे टाळले होते. निकालानंतर केंद्रात कुणाची सत्ता येते त्यावरून भूमिका ठरवली जाईल, असे वायएसआरच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले होते. त्याप्रमाणे जगनमोहन यांनी आज मोदींची भेट घेऊन आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

जगनमोहन रेड्डी यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांची देखील भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “जर भाजप २५० जागांवर सिमित राहिले असते, तर आम्ही त्यांना सत्तास्थापनेसाठी पाठिंबा दिला असता. मात्र भाजपने ३०३ जागा मिळवल्या आहेत. त्यांना आमची गरज नाही. मात्र आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणारच आहोत. यासाठी पुढील पाच वर्षात त्यांच्या वारंवार भेटी घ्याव्या लागल्या तरी चालतील.”

- Advertisement -

आंध्र प्रदेश राज्यात लोकसभेसोबतच विधानसभेच्याही निवडणुका झाल्या होत्या. जगनमोहन यांच्या वायएसआर पक्षाने १७६ पैकी १५१ जागांवर विजय मिळवला आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टीला फक्त २३ जागा मिळवता आल्या. तर लोकसभेच्या २५ जागांपैकी वायएसआरने २२ जागा जिंकल्या आहेत. तेलगू देसमला फक्त ३ जागांवर समाधान मानावे लागले. ३० मे रोजी जगनमोहन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यला नरेंद्र मोदी यांनी देखील उपस्थित रहावे, असे निमंत्रण देखील जगनमोहन यांनी दिले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -