घरमुंबईआपलं महानगरच्या श्रीगणेश चित्र, इको-फ्रेंडली स्पर्धेचा गुणगौरव सोहळा

आपलं महानगरच्या श्रीगणेश चित्र, इको-फ्रेंडली स्पर्धेचा गुणगौरव सोहळा

Subscribe

श्रीगणेशाय नमः असे म्हणत कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्याची आपली संस्कृती आहे. हीच परंपरा कायम ठेवत दै. आपलं महानगर या गेल्या २९ वर्षांपासून महानगरातील घराघरात पोहोचणार्‍या वृत्तपत्रानेही आपल्या पुर्नबांधणीच्या सुरुवातीलाच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन वाचकांशी असलेला आपला स्नेह आणखीन घट्ट करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. दै. आपलं महानगरने यंदाही बहुचर्चित श्रीगणेश चित्र स्पर्धा आयोजित केली होती. त्याच्याच जोडीला दै. आपलं महानगरचे वेबपोर्टल माय महानगरनेही पर्यावरणपूरक असणार्‍या इको फ्रेंडली घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन केले. या सर्व स्पर्धांना महानगर आणि राज्यभरातून उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. हजारोच्या संख्येने गणरायाची चित्र महानगरच्या कार्यालयात आली.

या स्पर्धेतील विजेत्यांची निवड करणे हे परिक्षकांसाठी जोखमीचे काम ठरले. त्यातूनही विविध गटातील पहिल्या तीन विजेत्याची निवड परिक्षकांनी केली आणि त्यांचा कौटुंबिक पण दिमाखदार असा गुणगौरव सोहळा शनिवार, २० ऑक्टोबर २०१८ रोजी माटुंगा येथील रुईया महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. यावेळी जय मल्हारफेम लक्ष्मी अर्थात पूर्वा सुभाष, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कब्बडीपटू सोनाली शिंगोटे, हर्ष पॅकर्सचे व्यवस्थापकीय संचालक संदीप धुरी, जागतिक स्तरावरील ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस, कलादिग्दर्शक दिलीप पवार, आपलं महानगरचे वरिष्ठ संपादक संजय परब आणि या सगळ्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहणारे आपलं महानगरचे संपादक संजय सावंत आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

- Advertisement -

एका वृत्तपत्र आणि वेबपोर्टलच्या स्पर्धेला मिळालेला वाचकांचा प्रतिसाद आणि बक्षिस समारंभाला लाभलेली त्यांची उपस्थिती ही आपलं महानगरची लोकप्रीय सांगण्यासाठी पुरेशी होते. समारंभाला मोठ्या प्रमाणात बच्चे कंपनी आणि त्यांच्या पालकांनी उपस्थिती दर्शवून वृत्तपत्रावर आणि लाडक्या बाप्पावर असलेले स्नेह दाखवून दिले. अतिशय नियोजित पद्धतीने हा सोहळा पार पडला. याला अधिक नयनसुखद बनवण्याचे श्रेय जाते ते ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनिस यांना. आपल्या कुंचल्याच्या रेखाटनाने पांढर्‍या शुभ्र कागदावर व्यक्तींनी चित्र रेखाटत आपल्या जीवनातील विविध टप्प्यातील अनुभवांना उलगडा सबनिस यांनी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला केला. समारंभाला मिळालेली कलात्मक सुरुवात ही अखेरपर्यंत कायम राहिली. हा सर्व कार्यक्रम माय महानगरच्या फेसबुक पेजवर लाईव्ह दाखवल्यामुळे सभागृहात नसलेल्या वाचकांनाही त्याचा आनंद लुटता आला. अखेर बक्षिस समारंभाच्या मूळ कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि बच्चे कंपनी तसेच विजेत्यांची ताणून ठेवलेली उत्सुकता संपली. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते गजाननाच्या मूर्तीसमोर दिप प्रज्वलन करून गुणगौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

प्रथम कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. अभिनेत्री पूर्वा सुभाष आणि कब्बडीपटू सोनाली शिंगोटे यांनी आपला अनुभव लहानग्यांसमोर मांडला. तर आपलं महानगरचे उपसंपादक संतोष (आबा) माळकर यांनी श्रीगणेश चित्र स्पर्धेची रुपरेषा आणि परंपरा तसेच यंदाच्या वर्षी त्याला मिळालेला प्रतिसाद उपस्थितांसमोर मांडला. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी वेबपोर्टलचे सहकारी प्रवीण वडनेरे आणि लीनल गावडे यांनी पार पाडली. तर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आली.

- Advertisement -

छंद जोपासण्यासाठी पालकांनी पाठिंबा द्या
आंतराष्ट्रीय क्रीडापट्टू सोनाली शिंगोटेचा पालकांना सल्ला

लहान मुलांनी त्यांचे छंद जोपासण्यास गणेश चित्रकला स्पर्धासारख्या स्पर्धांमधून नक्कीच मदत होईल. परंतु मुलांना त्यांचे छंद जोपासण्यासाठी त्यांच्या पालकांनीही पाठिंबा दिला पाहिजे असा सल्ला आंतरराष्ट्रीय कबड्डीपट्टू सोनाली शिंगोटे हिने ‘गणेश चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा 2018’च्या कार्यक्रमावेळी मुलांसोबत उपस्थित असलेल्या पालकांना दिला.

मी बारावीमध्ये असताना अभ्यास करून फारसे करियर करता येणार नाही असे माझ्या भावाकडे पाहिल्यानंतर लक्षात आले. माझा भाऊ बीएससी झाला होता. पण त्याच्याकडे नोकरी नव्हती. त्यामुळे शिकून काही होत नाही असे मला वाटू लागले. आपण काहीतरी अ‍ॅक्टिव्हीटी करावी असे मला वाटू लागले. मला खेळात आवड होती. म्हणून मी एम.डी. महाविद्यालयात कबड्डीच्या सरावाला जाऊ लागले. सरावाला जात असताना सकाळी कॉलेज व सायंकाळी कबड्डीचा सराव या दोन्ही गोष्टींचा मेळ घालावा लागत असे. पण यामध्ये मला माझ्या आईवडिलांनी उत्तम पाठिंबा दिला. माझ्या पालकांकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळेच मी आज आंतरराष्ट्रीय कबड्डीपट्टू होऊ शकली, असे सोनालीने सांगितले.

आर्थिकदृष्ट्या सर्वच पालक मुलांना पाठिंबा देऊ शकत नाहीत. परंतु पालकांनी आपल्या मुलांना मानसिकदृष्ट्या पाठिंबा दिल्यास ते नक्कीच पुढे जाऊ शकतात. माझी बी.कॉमची परीक्षा सुरू असताना सायंकाळी स्पर्धा व सकाळी परीक्षेचा पेपर. यामुळे मला पेपर व कबड्डीची स्पर्धा अशी तारेवरची कसरत करावी लागत असे. परीक्षेचा अभ्यास मी रात्री करत असे. परंतु बर्‍याचदा अभ्यास पूर्ण होत नसे. सकाळी मी आईला जेव्हा अभ्यास पूर्ण झालेला नसल्याचे सांगत असे त्यावेळी आई माझ्यावर विश्वास दाखवून मला म्हणते असे की, तु रात्रभर अभ्यास केलेला मी पाहिला आहे. त्यामुळे तु चिंता करू नकोस तु नक्की उत्तीर्ण होशील. आईच्या पाठिंब्यामुळे माझ्यामध्ये विश्वास निर्माण व्हायचा, असे सांगत सोनालीने तिला घरातून मिळालेला पाठिंबा उपस्थितांसमोर मांडत त्यांनाही आपल्या मुलांना पाठिंबा देण्यास सांगितले. तुम्हाला जे छंद आहेत. ते जोपासा आणि त्याला तुम्ही प्रोफेनल बनवलात तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल असा सल्लाही तिने उपस्थित लहान मुलांना दिला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -