अंबरनाथच्या गुरुकुलमध्ये यंदा ४८ विद्यार्थी इंग्रजीतून मराठीत

Mumbai
मराठीसाठी आशेचा किरण

इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रस्थामुळे मराठी शाळांचा घटत जाणारा पट हे राज्यातील शिक्षण क्षेत्राचे सध्याचे वास्तव. मात्र आता इंग्रजी माध्यमातील दोष, उणीवा आणि त्रुटी लक्षात आल्यानंतर पुन्हा एकदा पालकांनी विचारपूर्वक आपल्या पाल्यांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालून आधी केलेली चूक सुधारली आहे. अंबरनाथ येथील द एज्युकेशन सोसायटीच्या गुरूकुल या बारा तासांच्या मराठी माध्यमाच्या शाळेत यंदा प्राथमिक आणि माध्यमिक विभागात चाळीसहून अधिक विद्याार्थी इंग्रजी माध्यमातून दाखल झाले आहेत. राज्यभरातील उपक्रमशील शाळांसाठी हे आशादायक चित्र आहे.

मातृभाषेतून घेतलेले शिक्षण अधिक उपयुक्त ठरत असल्याचा निर्वाळा सर्वच शिक्षणतज्ज्ञ देत असले तरी स्वभाषेविषयीच्या न्यूनगंडामुळे बहुतेक पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे आहे. परिणामी गेल्या दोन दशकांत राज्यातील अनेक मराठी शाळांचा पट घसरला. काहींच्या तुकड्या कमी झाल्या.

कमी विद्यार्थी संख्येमुळे अनेक संस्थांना शाळा चालविणे कठीण ठरू लागले आहे. मात्र काही उपक्रमशील मराठी शाळांनी या प्रतिकूल परिस्थितीतही आपले अस्तित्त्व कायम राखले आहे. अंबरनाथ येथील गुरूकुल ही बारा तासांची शाळा त्यापैकी एक. १९ वर्षांपूर्वी कानसई विभागात गुरूकुल सुरू झाले. या शाळेत अभ्यासाबरोबरच योगसाधना, व्यायाम, विविध प्रकारचे खेळ, क्षेत्रभेट आदी उपक्रम राबवले जातात. त्यामुळे विद्याार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होतो. यंदा दहावीत शाळेतील नेहा नेहेते ही विद्याार्थिनी अंबरनाथमधून पहिली आली. इतर क्षेत्रातही शाळेचे विद्यार्थी चमकदार कामगिरी करतात.

गुरूकुल शाळेचा लौकिक लक्षात घेऊन यंदा अनेक पालकांनी इंग्रजी माध्यमातून त्यांच्या मुलांना काढून या शाळेत टाकले आहे. मुख्याध्यापक संतोष भणगे यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा प्राथमिक विभागात प्रवेश देण्यात आलेले ४५ पैकी २३ विद्यार्थी इंग्रजी शाळेतून गुरूकुलमध्ये आले आहेत. त्याचप्रमाणे माध्यमिक विभागातही २५ मुले इंग्रजीतून आली आहेत.

मराठी माध्यमात चांगले पर्याय नसल्याने मुलाला इंग्रजी शाळेत घातले होते. मात्र अंबरनाथच्या या शाळेविषयी समजल्याने यंदा मी निर्णय बदलला आणि कॉन्व्हेंटमधून यंदा मुलाचे नाव काढून दुसर्‍या इयत्तेत गुरूकुलमध्ये घातले.
– नंदिनी सोनार, पालक, उल्हासनगर.

मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने मुलांना ते अधिक समजते. त्यात गुरूकुलमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. त्यामुळे आमच्या दोन्ही मुलांना मी इंग्रजी शाळेतून मराठीत घातले आहे. पाचवीपर्यंत इंग्रजी माध्यमात शिकलेला मानस आता सहाव्या इयत्तेत गुरूकुलमध्ये जाईल. धाकटी मुलगी संजनाही तिसरीचे धडे मराठीतून गिरवेल.
-आनंद प्रभुदेसाई, पालक.

पोलीस खात्यातील नोकरीमुळे मुलांचा अभ्यास घ्यायला वेळ मिळत नव्हता. या शाळेविषयी समजले आणि पूर्वा आणि केशव या दोन्ही मुलांना इंग्रजी माध्यमातून काढून या शाळेत घातले. पूर्वाने पाचवीत तर केशवने चौथीत प्रवेश घेतला आहे.
-सोमनाथ पाटील, पोलीस हवालदार, उल्हासनगर.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here