कारागृहात अर्णब यांनी वापरला मोबाईल, अंतर्गत चौकशी सुरू!

अर्णब गोस्वामी यांना याच शाळेत ठेवण्यात आलं होतं.

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना येथील क्वारंटाइन जेलमधून सुरक्षेच्या कारणास्तव तळोजे मध्यवर्ती कारागृहात हलवले असल्याचे सांगितले जात असले तरी यामागील वेगळी कारणे आता पुढे येत आहेत. अर्णब गोस्वामी यांनी आपला मोबाईल फोन वापरल्याचे समोर आले असून, जेलमध्ये असताना त्यांच्याकडे मोबाईल आला कसा? याची चौकशी आता सुरू झाली आहे.

१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांना नगर पालिका शाळा क्रमांक १ मधील तात्पुरत्या क्वारंटाइन जेलमध्ये ठेवण्यात आले. त्यावेळी त्यांचा मोबाईल काढून घेण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी आपला मोबाईल वापरल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी ते लाइव्ह असल्याचे सोशल मीडियावर दिसून आल्याने कारागृह प्रशासनाशी बोलून त्यांना रविवारी तातडीने तळोजे मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले. त्यांच्याकडे मोबाईल कसा आला? याची आता चौकशी सुरू असल्याचे तपास अधिकारी जमीर शेख यांनी सांगितले. कारागृहाचे अधीक्षक ए. टी. पाटील यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. क्वारंटाइन जेलमध्ये दुसरी व्यवस्था नसल्याने कारागृहाचा मोबाईल कैद्यांना त्यांचे नातेवाईक आणि वकिलांशी बोलण्यासाठी उपलब्ध करून दिला जातो. मात्र कैद्यांना त्यांचा स्वतःचा मोबाईल वापरता येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अर्णब यांनी मोबाईल वापल्याची बाब समोर आल्याने कारागृहाच्या सुरक्षिततेबाबत आता संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अलिबाग कारागृहाच्या ताब्यात असताना अर्णब गोस्वामी यांनी त्यांचा मोबाईल वापरल्याची बाब समोर आली आहे. याची चौकशी सुरू झाली असून, चौकशीत सगळी बाब समोर येईल.

ए. टी. पाटील, कारागृह अधीक्षक