मुंबईत संध्याकाळच्यावेळीही झाडलोट

कमर्शियल भागांमध्ये सकाळसह संध्याकाळीही साफसफाई राखली जाणार

Mumbai

स्वच्छ सर्वेक्षणात यंदा महापालिका सहभागी होणार असून त्यादृष्टीकोनातून मुंबईत स्वच्छता राखण्याचा अधिकाधिक प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे यापुढे मुंबईत झाडलोट करून दैनंदिन निर्माण होणारा कचरा उचलला जात असला तरी कमर्शियल भागांमध्ये संध्याकाळच्यावेळीही झाडलोट केली जाणार आहे. सध्या फोर्ट,नरिमन पॉईंटसह कुलाबा आदी भागांमध्ये झाडू मारुन कचरा उचलला जात आहे. परंतु स्वच्छ मुंबई सर्वेक्षणातंर्गत मुंबईतील सर्वच कमर्शियल भागांमध्ये संध्याकाळच्यावेळीही झाडलोट करत परिसर स्वच्छ राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मुंबईत दरदिवशी ७२०० मेट्ीक टन कचरा निर्माण होतो. हा सर्व कचरा कांजूर आणि देवनार डम्पिंग ग्राउुंटवर टाकला जातो. परंतु दरदिवशी निर्माण होणार्‍या कचर्‍याची साफसफाई करून कचरा पेट्यांमध्ये जमा करून तिथून मग महापालिकेच्यावती वाहनांतून डम्पिंग ग्राउुंडवर नेला जातो. स्वच्छता आणि कचर्‍याची विल्हेवाटीसाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने योग्यप्रकारे काम सुरु असले तरी स्वच्छ सर्वेक्षण २०२०करताही महापालिकेने कंबर कसली आहे. मागील शनिवारी घनकचरा व्यवस्थापन विभागाचा परभार स्वीकारणार्‍या अतिरिक्त आयुक्त डॉ.अश्विनी जोशी यांनी वडाळा येथील ‘कल्पतरु’ या आपत्कालिन विभागाच्या कार्यालयात सर्व सह आयुक्त, उपायुक्त तसेच विभागीय सहायक आयुक्त यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी स्वच्छ सर्वेक्षणाच्यादृष्टीकोनात सर्वांना निर्देश देत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या होत्या.

मात्र, या स्वच्छ सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून महापालिकेने २४ विभाग कार्यालयांमधील काही कमर्शियल भागांमध्ये संध्याकाळच्यावेळीही झाडलोट करत स्वच्छता राखण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महापालिकेच्यावतीने सकाळच्या एकदाच झाडलोट केली जाते. परंतु महापालिकेच्या ए विभागातच केवळ दिवसात दोन वेळा स्वच्छता राखली जाते. त्याच धर्तीवर इतर भागांमधील कमर्शियल वापर होत असलेल्या परिसरांमध्येही सकाळसह संध्याकाळच्यावेळीही स्वच्छता राखली जाणार आहे. घनकचरा विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मुंबईतील कमर्शियल भागांमध्ये संध्याकाळच्यावेळीही स्वच्छता राखली जाणार आहे. त्यासाठी विशेष गणवेशधारी कामगार तैनात करून सर्वेक्षणाबाबतची जनजागृतीही केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.