कोरोनाच्या सावटाखाली आजपासून २ दिवसीय पावसाळी अधिवेशन!

maharashtra vidhan sabha

गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून राज्यात कोरोनाचं थैमान सुरू आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाविकासआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतरचं पहिलं अधिवेशन देखील मुदतीपूर्वीच गुंडाळावं लागलं होतं. आता पावसाळी अधिवेशन देखील दोनदा पुढे ढकलल्यानंतर अखेर उद्यापासून सुरू होत आहे. मात्र, ते देखील फक्त दोन दिवसांचं अधिवेशन असणार आहे. या पार्श्वभूमीवर आधीच अधिवेशनावर कोरोनामुळे परिणाम झालेला असताना आता कोरोनाच्या सावटाखाली हे अधिवेशन सुरू होणार आहे. कारण अधिवेशन सुरू होण्याआधीच तब्बल ३५ आमदार आणि विधानभवनातील ३७ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याचं समोर आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधानभवन परिसरात एकूण १७०० टेस्ट करण्यात आल्या. त्यातून हे अहवाल समोर आले आहेत.

३५ आमदार, ३७ कर्मचारी पॉझिटिव्ह

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या म्हणजेच ७ सप्टेंबर आणि ८ सप्टेंबर असे दोन दिवस हे अधिवेशन होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता फक्त कोरोनाची चाचणी करून निगेटिव्ह असल्याचे अहवाल असणाऱ्यांनाच अधिवेशनासाठी प्रवेश दिला जाणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनासाठी सर्व आमदारांसोबत विधानभवन परिसरातील कर्मचारी, सुरक्षारक्षक अशा सगळ्यांची मिळून एकूण १७०० जणांची चाचणी करण्यात आली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की आत्तापर्यंत ३५ आमदार आणि ३७ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या सावटाखालीच हे अधिवेशन होणार असल्याचं दिसून येत आहे.

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा), महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीववका व नोक-या याांवरील कर (सुधारणा), महाराष्ट्र आकस्मिकता निधी (दुसरी सुधारणा), काही महानगरपालिका महापौरांच्या व उपमहापौरांच्या निवडणुका तात्पुरत्या स्वरुपात पुढे ढकलणे अशा काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरचे अध्यादेश यावेळी पटलावर ठेवण्यात येणार आहेत.