घरमुंबईभाजपत गुन्हेगारांना प्रवेश

भाजपत गुन्हेगारांना प्रवेश

Subscribe

गुन्हेगारांनी भाजपत प्रवेश केलेला आहे. पक्षाची वैयक्तीक संघटना शून्य आहे. सर्व उमेदवार आयात केलेले आहेत, असा सणसणीत आरोप भाजपचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी भाजपत प्रवेश करण्याच्या काही दिवस अगोदर एका मुलाखतीत केला होता. या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच ‘ट्रोल’ होतो आहे. गुन्हेगारांनी भाजपत प्रवेश केला म्हणणारेच आज भाजपत कसे, असा आरोप उपस्थित केला जाऊ लागला आहे. हा ‘ट्रोल’ व्हिडिओ नगरसह अख्ख्या महाराष्ट्रात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

भाजपचे उमेदवार सुजय विखे सोशल मीडियावर वारंवार ‘ट्रोल’ होऊ लागले आहेत. त्यांची राजकीय अपरिपक्वता यातून उघड होऊ लागली आहे. ही बाब त्यांच्यासाठी चांगलीच अडचणीची ठरू शकणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून लोकसभा निवडणुकीची तयारी करणार्‍या विखे-पाटील यांनी भाजपत प्रवेश करण्याच्या काही दिवस अगोदर एका वर्तमानपत्राच्या कार्यालयात जाऊन मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला होता. त्या मुलाखतीत विखे म्हणाले की, ‘भाजपची मूळ संघटना राहिलेली नाही.

- Advertisement -

देश, राज्य व स्थानिक पातळीवर सर्व उमेदवार आयात केलेले आहेत. पक्षात सर्व गुन्हेगारांनी प्रवेश केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक भारतीयांच्या खात्यावर १५ लाख रुपये देण्याचे जाहीर केले होते. दिले का त्यांनी ? घोषणा करायला काय जातेय?’, असे म्हणून त्यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही खिल्ली उडवली होती. आता विजयासाठी त्याच पंतप्रधान मोदी यांची सभा घेण्याची वेळ त्यांच्यावर आली.

गुन्हेगारांनी भाजपत प्रवेश केला, असे म्हणणार्‍या सुजय विखे यांनीही भाजपत प्रवेश केलेला आहे. त्यामुळे ते वक्तव्य नेमके कुणाला लागू होते, असा सवालही उपस्थित केला जाऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुजय विखे पाटील यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला आहे. तसेच त्यांच्या राजकीय विरोधकांनी तो व्हायरल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -