घरमुंबईराज्यात दुसर्‍यांदा पुलोद प्रयोग

राज्यात दुसर्‍यांदा पुलोद प्रयोग

Subscribe

शिवस्वराज्य पुरोगामी आघाडीची चर्चा, भाजपचीही मॅजिक फिगरसाठी धडपड

राज्यात भाजप आणि शिवसेना महायुतीचे सरकार येण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार असे सांगून काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेबरोबर समन्वय थांबवून बंद केलेल्या दाराला आता घट्ट कडी घातली आहे. दुसरीकडे फडणवीस हे खोटे बोलत असून अशा खोट्या लोकांबरोबर सत्ता कशी काय स्थापन करायची म्हणून आम्ही चर्चेची दारे बंद केली आहेत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही स्पष्ट केल्याने आता भाजप-शिवसेना युतीचे सरकार येणार नाही, हे वास्तव समोर आले आहे. परिणामी राज्यात दुसर्‍यांदा पुलोद प्रयोग होण्याची दाट शक्यता असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी १९८०च्या दशकात पुरोगामी लोकशाही दल स्थापन करत सत्ता स्थापन केल्याचा इतिहास आहे.तर भाजपने 14५ ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी जोरदार धडपड सुरू केल्याची माहीती भाजपच्या सूत्रांनी दिली.यावेळी मुख्यमंत्री आमचाच असा ठाम निर्धार करणार्‍या शिवसेनेची पडद्यामागून सुरू असलेली हालचाल आता वास्तवात येण्याचे मार्ग खुले होताना दिसत आहेत. राज्यात ‘शिवस्वराज्य पुरोगामी आघाडी’ सरकार स्थापन होणार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्रात ‘दुसरा पुलोद प्रयोग’ आकाराला येत असून शिवसेनेचा मुख्यमंत्री, सत्तेत सोबत राष्ट्रवादी काँग्रेस राहणार आहे आणि विशेष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सरकारला काँग्रेस बाहेरून पाठिंबा देईल, असे सांगितले जात आहे.

शिवसेनेचे 56 आमदार असून त्यांना 7 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिल्याने त्याची संख्या 63 झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आमदार असून ते शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी होतील आणि या सरकारला 44 काँग्रेस आमदारांचा बाहेरून समर्थन राहील, असा दुसरा पुलोद प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करत आहेत. विशेष म्हणजे निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना पुन्हा पक्षात आणण्यासाठीही चाचपणी केली जात आहे. 1977 मध्ये वसंतदादा पाटील यांचे काँग्रेस सरकार पाडून शरद पवार यांनी पुलोद सरकारचा प्रयोग केला होता. फोडलेले काँग्रेसचे आमदार सोबत घेऊन त्याला जनता पक्ष आणि जनसंघ आमदारांची जोड देत पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केले होते. सिल्वर ओकला आता ठाण मांडून बसलेल्या पवारांनी आपला सारा अनुभव पणाला लावून बिगर भाजप सरकार बनवण्याचा निर्धार केलाआहे.

- Advertisement -

पूर्वी राष्ट्रवादीत असलेले आणि आता शिवसेनेचे आमदार झालेल्या एका ज्येष्ठ आमदाराने पुलोद प्रयोगाला पुष्टी दिली आहे. मात्र या अनुभवी आमदारांच्या म्हणण्यानुसार काँग्रेस बाहेरून पाठिंबा देणार नाही तर सत्तेत सहभागी होईल. शिवसेनबरोबर सत्तेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसचा एका मोठा गट उत्सुक आहे. काँग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते हे सध्या शरद पवार यांच्याशी संपर्कात असून सत्तेत सहभागी होणारा मोठा गट दिल्लीत सोनिया गांधी यांच्याबरोबर समजुतीचा मार्ग काढत आहेत.

दुसर्‍या बाजूला 105 आमदारांची संख्या असलेल्या भाजपने अपक्ष आमदार आणि गीता जैन, महेश बालदी अशा भाजप बंडखोर आमदारांची मोठ बांधून आपल्याकडे या घटकेला 123 आमदार असल्याचा दावा केला आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला 21 आमदार हवे असून शिवसेनसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार गळाला लावण्यासाठी ते जीवाचे रान करतील. हे करतानाच आधी सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेचा दावा करतील आणि विश्वासदर्शक ठरावावेळी फोडलेले आमदार आपल्या बाजूने उभे करतील, असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे अशा घोडेबाजाराचा भाजपला ताजा अनुभव असून हा प्रयोग त्यांनी कर्नाटक, गोवा आणि मणिपूरमध्ये करून दाखवला आहे.

- Advertisement -

युती आधी कोण तोडतो त्याची स्पर्धा
काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत ‘सत्याचे प्रयोग’ बोलून दाखवले. मात्र दोघांनीही युती तोडण्याची घोषणा केलेली नाही. युती आम्ही तोडली नाही, त्यांनी तोडली, असे सांगून भाजप आणि शिवसेना जनतेची सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करेल.

पुन्हा फडणवीस नाही?
यदाकदाचित भाजपचे सरकार सत्तेत आल्यास देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता खूप कमी असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. फडणवीस यांच्याऐवजी सुधीर मुनगंटीवार, चंद्रकात पाटील किंवा रावसाहेब दानवे यांच्यापैकी एकाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडू शकते.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -