एस अँड टी प्रभाग समितीच्या निकालावरून भाजप बिथरले

चिटणीस यांच्या घराबाहेर नगरसेविकांचे आंदोलन

bjp corporator

मुंबई महापालिकेच्या एस व टी प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील निकालाने भाजप प्रचंड बिथरले असून निवडणूक निकालावरून पिठासीन अधिकारी असलेल्या महापौरांना जाब विचारण्याऐवजी चक्क महापलिका चिटणीस यांनाच त्यांनी टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता महापालिका चिटणीस संगीता शर्मा यांच्या निवासस्थानी भाजपच्या नगरसेविका व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोळा होत त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. चिटणीस हे महापालिका कर्मचारी असून भाजपला शिवसेना आणि महापौरांविरोधात आंदोलन करण्याची हिंमत नसल्याने ते आता शासकीय कर्मचाऱ्यांना टार्गेट करू लागले आहेत. विशेष म्हणजे शनिवारी घटस्थापना होऊन नवदुर्गेच्या पूजेला सुरुवात झाली. आणि त्याचा दिवशी एका महिलेला भाजपने अशा प्रकारे त्रास देण्यास सुरुवात केल्याने भाजपला नक्की काय करावे आणि काय करू नये हेच समजत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

शुक्रवारी ‘एस व टी’ प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे एक मत अवैध ठरले आणि चिठ्ठीवर लागणारा निकाल सेनेच्या बाजूने लागला. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या निवडणुकीत पिठासीन अधिकारी असलेल्या महापौरांनी हा निर्णय दिलेला असताना भाजपच्या नगरसेविकांनी याला जबाबदार हे महापलिका चिटणीस यांना धरले आहे. निवडणुकीच्या बैठकीत चिटणीस यांना कोणताही अधिकार असून पिठासीन अधिकारी यांचा निर्णय अंतिम असतो.

त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांकडून महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात आंदोलन होईल असे वाटत असतानाच त्यांनी चिटणीस संगीता शर्मा यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी जात हल्लाबोल केला. संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान भाजपच्या नगरसेविका संगीत ज्ञानमूर्ती शर्मा आणि दक्षा पटेल यांच्यासह गोरेगाव, मालाड, मुलुंड , भांडुप आणि शहर भागातील नगरसेविका यांनी चिटणीस यांच्या इमारतीखाली ठिय्या मारत घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला.

भाजपच्या शर्मा व पटेल या प्रथम मनपा चिटणीस यांना भेटण्यास आल्या होत्या. त्यावेळी चिटणीस यांनी त्यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगत हा निर्णय पिठासीन अधिकाऱ्यांचा असल्याचे सांगितले. त्याचवेळी पटेल यांनी फोनवरून इतर नगरसेविकाना कल्पना देण्यास सुरुवात केली. याची कुणकुण लागताच मनपा चिटणीस घरी निघून गेल्या. त्यानंतर इतर १५ ते २० भाजप नगरसेविका तिथे पोहोचल्या. मनपा चिटणीस यांनी प्रसंगावधान राखून घरी निघून गेल्या नसत्या तर या नगरसेविकांकडून त्यांना दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शुक्रवारी निवडणुकीनंतर भाजपच्या काही नगरसेविकांनी मनपा चिटणीस यांना धक्काबुक्की केली होती. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी भाजपकडून एका महिलेला अशाप्रकारे दिला गेलेला मानसिक त्रास हा निंदनीय असल्याच्या प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटत आहे.