घरताज्या घडामोडीस्थायी समितीत भाजपचे एक मत झाले कमी

स्थायी समितीत भाजपचे एक मत झाले कमी

Subscribe

भाजप आयत्या वेळी काँग्रेसला करू शकते मदत

विरोधी पक्षनेतेपदाची माळ गळ्यात न पडलेल्या पहारेकरी बनलेल्या भाजपने आक्रमक होत सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणण्याच्या रणनिती आखल्या आहेत. त्यामुळे येत्या स्थायी समिती व शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला जागा दाखवण्याचा विडा उचलणाऱ्या भाजपने आधीच आपली हार मान्य केली आहे. स्थायी समितीत नामनिर्देशित नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांची नियुक्ती झाल्याने त्यांचे एक मत कमी झाले आहे. नामनिर्देशित नगरसेवकाला मतदानाचा अधिकार नसल्याने आधीच एक मतांचा फरक होता, तिथे आता दोन मतांचा फरक पडलेला आहे. त्यामुळे आता भाजपने आयत्या वेळी उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवाराला मतदान केल्या मोठा करिष्मा घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक येत्या ५ ऑक्टोबर रोजी होत असून या समितीवर शिक्षण समिती अध्यक्ष हा पदसिध्द सदस्य मानला जातो. त्यामुळे उर्वरित सदस्यांचे संख्याबळ पाहता शिवसेनेचे ११, भाजपचे १०, काँग्रेसचे ३, राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाचे प्रत्येकी एक याप्रमाणे आहे. परंतु भाजपने रिक्त सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची  नियुक्ती केली आहे. त्यामध्ये त्यांनी निवृत्त सदस्यांच्या रिक्त जागांवर निवडून आलेल्या नगरसेवकांसह नामनिर्देशित नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांचीही नियुक्ती केली आहे. महापालिकेच्या अधिनियमानुसार पदनिर्देशित नगरसेवकाला मतदानाचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे शिरसाट हे या समितीवर नियुक्त झाले असले तरी त्यांना मतदानाचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे या समितीत भाजपचे जिथे १० सदस्य आहेत. त्यातील शिरसाट यांना मतदानाचा अधिकार नसल्याने मतदानात भाग घेणारे ९ सदस्य राहणार आहे. म्हणून निवडून आलेल्या सदस्याची नियुक्ती करण्याऐवजी भाजपने मतदानाचा अधिकार नसलेल्या नामनिर्देशित नगरसेवकाची वर्णी लावत एकप्रकारे शिवसेनेबरोबरचा मैत्रीधर्म पाळत त्यांचा विजय सुकर करण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

तर होवू शकतो चमत्कार

शक्यता एक

स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्यावतीने यशवंत जाधव, काँग्रेसच्यावतीने आसिफ झकेरिया आणि भाजपच्यावतीने Ad. मकरंद नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यामुळे ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानापूर्वी १५ मिनिटांपूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. या कालावधीत काँग्रेस किंवा भाजपचा कोणता उमेदवार आपला अर्ज मागे घेतो त्यानुसार निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसने आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास भाजप आपला अर्ज मागे घेईल आणि काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करेल. यामध्ये त्यामुळे भाजपला सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करता येईल आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय सुकर करत आघाडीतील बिघाडीचा सुरुंग लावता येईल. ही रणनिती शिक्षण समितीत यशस्वी झाल्यास शिक्षण समिती अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिध्द सदस्य असल्याने सत्ताधारी पक्षाचा सदस्य एकने कमी होईल व विरोधकांची संख्या एकने वाढेल.

कसे मतदान झाल्यास काय होईल?

  • काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सपासह भाजपची मते एकत्र झाल्यास शिवसेनेपेक्षा दोन मते वाढू शकतात.
  • काँग्रेसला भाजपने मतदान केले आणि समाजवादी पक्ष तटस्थ राहल्यास शिवसेनेपेक्षा एक मत वाढू शकते.
  • काँग्रेसला भाजपने मतदान केल्यास आणि राष्ट्रवादी व सपा तटस्थ राहिल्यास शिवसेना आणि काँग्रेस यांच्या मतांची बरोबरी होईल आणि चिठ्ठी पाडून उमेदवार निवडला जाईल

शक्यता दोन

शिवसेनेच्या वरिष्ठांनी काँग्रेसची मनधरणी केल्यास ते आपला अर्ज मागे घेतील किंवा काँग्रेस या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सभात्याग करेल. त्यामुळे भाजपला आपला हेतू साध्य करता येणार नाही.

- Advertisement -

शक्यता तीन

समितीतील संख्याबळानुसार शिवसेनेचे सदस्य प्रथम मतदान करतील, त्यानंतर भाजप व नंतर काँग्रेस असा क्रम असेल. परंतु सत्ताधारी पक्षानंतर विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मतदान व्हावे असा आग्रह भाजप धरू शकेल. त्यामुळे संख्याबळानुसार मतदान झाल्यास भाजपला आपली राजकीय खेळी खेळता येणार नाही. परंतु सत्ताधारी पक्ष व नंतर विरोधक यांच्यानंतर जर पहारेकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिल्यास काँग्रेसला पडलेल्या मतांचा अंदाज घेऊन भाजप आपला उमेदवार उभा असतानाही विरोधी पक्षाच्या पारड्यात आपली मते टाकू शकतात,अशीही शक्यता आहे.

शक्यता चार

या निवडणुकीत शेवटच्या क्षणाला काँग्रेस आणि भाजप दोघांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यास शिवसेना उमेदवार यशवंत जाधव यांची बिनविरोध निवड होवू शकते.

स्थायी समितीचे पक्षीय संख्याबळ

  • शिवसेना : ११  अणिक एक शिक्षण समिती अध्यक्ष
  • भाजप  :  १०( शिरसाट यांना मतदानाचा अधिकार नसल्याने ९ सदस्य घेवू शकतात भाग)
  • काँग्रेस  : ०३
  • राष्ट्रवादी  काँग्रेस : ०१
  • समाजवादी पक्ष  : ०१
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -