महापालिकेतली ‘पहारेकरी’ भाजप आता सत्तेतली ‘वाटेकरी’!

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने शिवसेनेसोबत आघाडी केल्यानंतर आता मुंबई महानगर पालिकेमध्ये देखील भाजप सत्तेत येणार आहे.

Mumbai
BJP Shivsena in BMC
मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना एकत्र

नुकतीच शिवसेना आणि भाजपाची युती जाहीर झाली. त्यामुळे आता महापालिकेतील पहारेकरीचे कपडे उतरवून भाजपा शिवसेनेसोबत सत्तेतील वाटेकरी ठरणार आहेत. ‘मार्च २०१७ च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीनंतर आमचे नगरसेवक पहारेकरी म्हणून काम पाहतील’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. तेव्हापासून महापालिकेत प्रभाग समिती अध्यक्षपद वगळता कोणत्याही वैधानिक, विशेष समित्यांचे अध्यक्षपद भाजपाच्या नगरसेवकांनी स्वीकारलेले नाही. मात्र, युतीच्या यशस्वी फॉर्म्युल्यानंतर पुढील आर्थिक वर्षापासून भाजपा पुन्हा सत्तेतील वाटेकरी होऊन पदे भूषवणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

भाजपने नाकारली होती पालिकेतली पदं!

मागील लोकसभा निवडणूक युतीत लढल्यानंतर विधानसभा आणि मार्च २०१७ ला झालेली महापालिका निवडणूक दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढवली. विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढल्यावर शिवसेनेने, भाजपा सरकारला पाठिंबा जाहीर केला. पण ‘मुंबई महापालिका निवडणुकीत सेनेला पाठिंबा न देता पहारेकरी म्हणून आमचे नगरसेवक काम करतील’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. त्यामुळे आजवर भाजपच्या वाट्याला येणाऱ्या उपमहापौर, सुधार समिती, शिक्षण समिती, विधी, स्थापत्य समिती या समित्यांचे अध्यक्षपद भाजपने स्वीकारलेले नाही. त्यामुळे सेनेच्या बहुतांशी नगरसेवकांना विविध समित्यांचे अध्यक्षपद भूषवता आले.


हेही वाचा – महापालिकेत विरोधक आक्रमक, पण पहारेकरी गप्पच

भाजप नगरसेवकांच्या गळ्यात अध्यक्षपदांची माळ!

मात्र, आता पुढील निवडणुकांसाठी युतीची अधिकृत घोषणा झाल्याने यापुढे पहारेकरी बनून सेनेला अडचणीत आणणे भाजपाला शक्य होणार नाही. त्यामुळे पहारेकरी म्हणून भूमिका न बजावता यापूर्वी ज्याप्रमाणे महापालिकेत युतीची सत्ता असायची, त्याप्रमाणेच सत्तेत सामील होऊन पदे भूषवायची, अशी तयारी भाजपाने सुरू केली आहे. त्यामुळे येत्या एप्रिल महिन्यापासून सर्व वैधानिक आणि विशेष समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत पुन्हा एकदा मार्च २०१६ नुसार पदांचे वाटप होऊन भाजपा नगरसेवकांच्या गळयात अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here