घरमुंबईमहापालिकेत विरोधक आक्रमक, पण पहारेकरी गप्पच

महापालिकेत विरोधक आक्रमक, पण पहारेकरी गप्पच

Subscribe

भाजपकडून विरोधकांच्या कामांची दखल, निरीक्षकांना लक्ष घालण्याच्या सूचना

मुंबई महापालिकेत विरोधी पक्ष आक्रमक होत असताना पहारेकरी म्हणून प्रमुख भूमिका बजावणारा भाजप मात्र ‘नरो वा कुंजरो वा..’च्या भूमिकेत आहे. भाजपकडून कोणत्याही मुद्यावर ठोस भूमिका मांडली जात नाही. त्यामुळे महापालिकेत काय भूमिका मांडायची या विवंचनेत भाजपचे नगरसेवक अडकले आहेत. खुद्द भाजपचे महापालिका गटनेते मनोज कोटक दोलायमान स्थितीत असून पक्षाची भूमिका त्यांना मांडण्यात येत आहे. विरोधक आक्रमक होत असल्याने याची दखल भाजपकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे पक्षाने महापालिका निरिक्षक योगेश सागर यांना महापालिकेच्या कारभारात विशेष लक्ष घालण्याच्या सूचना केल्या आहेत.

मुंबई महापालिकेत भाजप पक्ष हा पहारेकरीच्या भूमिकेत असला तरी प्रत्यक्षात गेल्या काही महिन्यांमध्ये भाजपकडून कोणत्याही प्रकारे आक्रमक भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे महापालिकेत भाजपचे नगरसेवक हे नावापुरतचे उरले आहेत. सभा आणि बैठकांमध्येही त्यांना आपली भूमिका मांडता येत नाही. खुद्द पक्षाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांच्याकडून पक्षाची भूमिका मांडली जात नसल्याने नगरसेवकांमध्येच गोंधळाचे वातावरण असल्याचा सुरही ऐकायला मिळत आहे. शिवसेना आणि भाजपची युती न होण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर भाजपनेही शिवसेनेच्या विरोधात आक्रमक होण्याचा निर्धार केला आहे. परंतु त्यानंतरही सहा आरक्षित भूखंडाचा मुद्दा असो वा बेस्ट संपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने मांडलेला सभा तहकुबीचा विषय असो.

- Advertisement -

यावर भाजपने आपली भूमिकाच स्पष्ट न करता एकप्रकारे सेनेची साथ देण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेविरोधात काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, सपा पक्षाचे नगरसेवक आक्रमक होत असतानाच भाजपचे गटनेते व त्यांचे सदस्य भूग गिळून गप्प बसून राहिले. या मुद्यावरून भाजपने विरोधकांना साथ देणे आवश्यक होते. परंतु तशी कोणतीही भूमिका न घेतल्यामुळे भाजपमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आता भाजपचे महापालिका निरिक्षक आमदार योगेश सागर यांना महापालिकेच्या कामकाजात विशेष लक्ष घालण्याच्या सूचना करण्यात आल्याचे समजते. त्यानुसार योगेश सागर यांनी यापूर्वी स्थायी समिती तसेच सुधार समितीत मंजूर केलेल्या विकास कामांचे प्रस्ताव मागूनही घेतले असल्याची माहिती मिळत आहे.

स्थायी समितीत शिवसेनेच्या बरोबरच संख्याबळ असतानाही कोणतेही उपद्रव मुल्य निर्माण केली जात नाही. सत्ताधारी पक्षाच्यावतीने मंजूर करण्यात येणार्‍या प्रस्तावांबाबत डोळ्यात तेल घालून जागता पहारा देणे अपेक्षित असताना, भाजप नगरसेवकांना कोणतीही भूमिका न घेता शांत बसून राहावे लागत आहे. सभा आणि बैठकांमध्ये गटनेत्यांनी पक्षाची भूमिका नगरसेवकांमध्ये पटवून देवून त्याप्रमाणे रणनिती आखायला हवी. परंतु गटनेते त्याप्रमाणे भूमिका मांडताना दिसत नाही. विरोधक आक्रमक होत असताना भाजपकडूनही त्याचप्रकारच्या कामगिरीची अपेक्षा असल्याने निश्चितच निरीक्षक यामध्ये लक्ष घालणार असल्याचेही बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -