घरताज्या घडामोडीअतिरिक्त आयुक्त जयश्री भोज यांना दुय्यम वागणूक; महत्त्वाची खाती आयुक्तांकडेच

अतिरिक्त आयुक्त जयश्री भोज यांना दुय्यम वागणूक; महत्त्वाची खाती आयुक्तांकडेच

Subscribe

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी रुजू झालेल्या जयश्री भोज यांना महत्वाच्या खात्यांची जबाबदारी न देता त्यांना आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दुय्यम वागणूक देण्यास सुरुवात केली आहे. भोज यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्या रिक्त जागेवर करण्यात आल्याने त्यांच्याकडील खात्यांचा भार नवीन अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे सोपवणे स्वाभाविक आहे. परंतु सिंघल यांच्याकडील रस्ते, पूल आणि पर्जन्य जलवाहिनी खात्याचा कारभार भोज यांच्याकडे न देता, आयुक्तांनी सह आयुक्त (विशेष) आशुतोष सलील यांच्या माध्यमातून स्वतः कडे ठेवून घेतला आहे. त्यामुळे या तिन्ही महत्वाच्या खात्यांमध्ये आयुक्तांनी कोणाही अतिरिक्त आयुक्ताला मध्ये न ठेवता सहआयुक्त यांच्यामार्फत या खात्यांची जबाबदारी थेट स्वतःकडे ठेवत इतर सहकारी अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तपदी जयश्री एस. भोज यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. जयश्री एस. भोज यांनी मागील शुक्रवारी पदभार स्वीकारला. अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्याजागी भोज यांची नियुक्ती झाली. त्यामुळे सिंघल यांच्याकडील कामांचा भार त्यांच्याकडे सोपवला जाईल, असे निश्चित मानले जात होते. ‘माय महानगर’ आणि ‘दैनिक आपलं महानगर’ने रस्त्यांसह महत्वाच्या खात्यांचा भार अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे जाणार असल्याचे वृत्त आधीच प्रसारित करून भोज यांच्याकडे मोजक्याच काही खात्यांसह विभागांचा भार सोपवला जाण्याची शक्यता वर्तवली होती.

- Advertisement -

मात्र, सिंघल यांच्याकडे असलेल्या रस्ते, पूल आणि पर्जन्य जल विभागाचा भार भोज यांच्याकडून काढून घेत उद्यान विभागासह अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांच्याकडील नगर अभियंता व प्राणिसंग्रहालय, प्रमुख व्यवसाय विकास, कोस्टल रोड आणि माहिती व तंत्रज्ञान व पूर्व उपनगरे विभागाचा भार सोपवला आहे.

मात्र, आयुक्तांनी रस्ते, पूल आणि पर्जन्य जल विभागाचा भार स्वतः कडे ठेवताना त्या खात्यांची जबाबदारी स्वतः नंतर सह आयुक्त (विशेष) यांच्याकडे सोपवली आहे. परंतु सलील हे मसुरीला २६ दिवसांच्या प्रशिक्षणाला जात असल्याने, या कालावधीत या खात्यांचा प्रभारी भार अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासु यांच्याकडे राहणार आहे.
सह आयुक्त (विशेष) आशुतोष सलील यांच्याकडे प्रथम परवाना, विधी, दक्षता आदी विभागाचा भार होता. परंतु आयुक्तांनी, अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांच्याकडील शिक्षण विभागाचा भार काढून आशुतोष सलील यांच्याकडे सोपवला. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांकडील शिक्षण विभागाचा भार सह आयुक्त (विशेष) यांच्याकडे असून तेच थेट आयुक्तांच्या अधिपत्याखाली काम करत आहे.

- Advertisement -

शिक्षणासारख्या महत्वाच्या खात्यांचा भार अतिरिक्त आयुक्तांकडून काढून सहआयुक्त (विशेष) यांच्याकडे सोपवल्यानंतर आता रस्ते, पूल आणि पर्जन्य जल आदी महत्वाच्या विभागाची जबाबदारी यासह आयुक्तांवर सोपवून आयुक्तांनी आपला विश्वास अतिरिक्त आयुक्त पदाच्या अधिकाऱ्यांवर नसल्याचे दाखवून दिले आहे.

यापूर्वी सहआयुक्त निधी चौधरी या धडाडीच्या अधिकारी होत्या. त्यांना त्यावेळी केवळ प्लास्टिक बंदी, परवाना विभाग, अतिक्रमण निर्मुलन, विधी विभाग, नियोजन अशी जबाबदारी सोपवली होती. परंतु क्षमता असूनही आयुक्तांनी, केवळ पदाचा विचार करता महत्वाच्या खात्यांच्या भार त्यांच्याकडे सोपवला नव्हता. यापूर्वी अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी नियमावर बोट ठेवत परदेशी यांचे मनसुबे यशस्वी होऊ दिले नव्हते. आरोग्य आणि माहिती तंत्रज्ञान तसेच अग्निशमन दलाची जबाबदारी समर्थपणे पेलूनही जोशी यांच्या कामावर आयुकांचा विश्वास नव्हता. त्यामुळे स्वतःची खुर्ची मजबूत करताना, जोशी यांची बदली करून घेण्यात आयुक्त यशस्वी ठरल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे. त्यामुळे जोशी यांच्याप्रमाणें भोज यांना बाजूला सारून सलील यांच्यामाध्यमातून न होणारी कामेही साध्य करून घेण्यासाठीच ही खात्यांची अदलाबदली केली असल्याचीही कुजबुज महापालिकेत ऐकायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -