‘कंगना’पुढे दाखवलेली मर्दुमकी

अनेक अनधिकृत बांधकामांच्या ज्या तक्रारी कार्यलयात अधिकाऱ्यांच्या टेबलावर पडून आहेत. त्या ठिकाणांची कधी पाहणी करायची का हिंमत दाखवली नाही?

Kangana Ranaut

कंगना रनौतच्या पाली हिलमधील बंगल्यातील वाढीव अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या एच / पश्चिम विभागाने कारवाई केली. त्यांच्या बंगल्याच्या बाहेरील बाजूला बुलडोझर चढवत बांधकाम तोडून टाकले. अंतर्गत भागातील बांधकामांवरही हातोडा चालवला. कोणत्याही अनधिकृत बांधकामाचे आम्ही समर्थन करणार नाही आणि करोनाचे बंगल्यावर कारवाई केली म्हणून आम्हाला दुःख झाले नाही. कंगनाच काय तर मुंबईतील प्रत्येक अनधिकृत बांधकामांवर कारवाई व्हायलाच हवी.

उलट मी तर म्हणेन या करवाईबद्दल महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासह त्यांच्या अधिकाऱ्यांचा गौरव व्हायला हवा. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सत्कार करायला हवा. एवढा प्रामाणिकपणा आणि कार्यतत्परता मुंबईकरांना कधीच पहायला मिळाली नव्हती. महापलिका अधिकाऱ्यांनी जर हा प्रामाणिकपणा कायम ठेवला तरी कंगनाच्या तोडलेल्या बांधकामांचे सार्थक होईल. नाहीतर आज कंगनाच्या निवासस्थानावर बुलडोझर चालवायचे आणि दुसरीकडे १०० अनधिकृत बांधकामांवर अधिकाऱ्यांच्या मर्जीचे शिक्के मारायचे, असं होता कामा नये.

कंगनाच्या बंगल्यावर का कारवाई झाली? कुणाच्या अस्मितेला ठेच लागल्याने झाली? कुणाच्या इशाऱ्यावर झाली? हे सर्वश्रुत आहे. याच्या खोलात आम्हाला शिरायचे नाही. परंतु महापालिकेचे अधिकारी जर सत्तेवर असणाऱ्या एका पक्षाच्या नेत्याला लालकारले म्हणून एका अभिनेत्रीच्या बंगल्यावर जाऊन पाहणी करत असतील. तेथील अनाधिकृत बांधकाम हुडकून काढत असतील. तर मग आजवर अशा अनेक अनधिकृत बांधकामांच्या ज्या तक्रारी कार्यलयात अधिकाऱ्यांच्या टेबलावर पडून आहेत. त्या ठिकाणांची कधी पाहणी करायची का हिंमत दाखवली नाही? तक्रार येऊनही जर बांधकामांची पाहणी केली जात नाही, तर मग तक्रार नसताना कंगनाच्या बंगल्यावर अधिकारी कसे पोहोचले? महापालिकेच्या अधिकाऱ्यांना लेखी तक्रार लागते. कुणाच्या तोंडी आदेशावर ही कारवाई जात नाही. या सर्व बाबी मुद्दाम अधोरेखित करत आहे.

कंगनाच्या बंगल्याचे बांधकाम आज होतंय का? ते बांधकाम झाल्यानंतर महापालिकेचे अधिकारी डोळ्याला झापडे लावून होते का? मंजूर आराखडा आणि प्रत्यक्ष बांधकाम यातील वाढीव क्षेत्रफळाच्या बांधकामांवर आताच सेनेशी पंगा घेतल्यानंतर का कारवाई केली? याचाच अर्थ या अनधिकृत बांधकामांची महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळे या अनधिकृत बांधकाम प्रकरणी संबंधित पदनिर्देशित अधिकारीच जबाबदार आहे. त्यांच्यावर आयुक्त कारवाई करणार का? ती हिंमत आयुक्त दाखवणार का? जोवर चिरीमिरी मिळते तोवर सर्व माफ असतं. तिथे अधिकारी ढुंकूनही पाहत नाही. त्यांच्या वरदहस्ताशिवाय कुणीही अनधिकृत बांधकाम करण्याची तयारी दाखवत नाही. मग कंगनाच्या बंगल्यात असेच मॅनेज केल्याशिवाय बांधकाम होत होतं का?

आज सर्व सामान्य माणूस आपल्या इमारतीत, आपल्या जागेत किंवा आपल्या घरात वाढीव बांधकाम करत असेल किंवा अंतर्गत बदल करत असेल तर महापालिकेचे अधिकारी नोटीसची धमकी दाखवत तिथे पोहोचतात. जर हात ओले झाले किंवा त्यांच्यासाठी कुणाची शिफारस झाल्यास तिथल्या बांधकामांना अभय दिलं जातं नाहीतर मग नोटीस बजावत प्रमाणिकपणाचा आव आणला जातो. यात काही प्रामाणिक अधिकारी अपवाद असले, तरी प्रत्येक वार्डात हा अनुभव प्रत्येकाला येतच असेल.

आज कुठल्याही बांधकामांची अधिकाऱ्यांना कल्पना नसते, असं म्हणणं चुकीचं ठरेल. प्रत्येक विभाग, प्रत्येक रस्ता, प्रत्येक गल्ली बोळात अनधिकृत बांधकामे स्कॅन करणारे डोळे गरागरा फिरत आहेत. हे तक्रारदार अधिकाऱ्यांनी तयार केलेले आहेत. पुढे त्यांच्याच नावाने माहिती अधिकार टाकून मग कारवाईची धमकी दिली जाते. त्यामुळे कारवाई करुन तोडकाम जिथं करायची असते, तिथं सर्व त्रुटी शोधून काढले जातात. मग सर्वसामान्य लोकांच्या तक्रारींनंतर ही तत्परता दाखवली जात नसल्याने कंगना सारख्या अभीनेत्रींच्या बंगल्यावर जेव्हा कारवाई होते, तेव्हा असे प्रश्न उपस्थित होतात. कंगनाच्या समोर दाखवलेली ही मर्दुमकी महापालिकेचे अधिकारी इतरांसमोर दाखवतील का?

कपिल शर्माने महापालिकेच्या कामकाजावर शंका तसेच टीका केल्यानंतर सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या ती जिव्हारी लागली आणि त्यांनी त्यांच्या स्टुडिओच्या बांधकामांवर केली. आर जे मालिष्का यांनीही अशीच टीका केल्यानंतर शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर त्यांच्या घरी कीटकनाशक विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवून तिथे सापडलेल्या अळ्यांप्रकरणी नोटीस बजावली. एवढेच काय तर सिने अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्या बंगल्यातही अशीच कारवाई केली होती. महापलिकेच्या एच पश्चिम विभागचे सहायक आयुक्त विनायक विसपुते आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी मग पालीहिल मधील सर्वच बंगल्याची पाहणी करावी. कंगनासारखे अनेक सेलिब्रिटींच्या घरात वाढीव आणि बेकायदा बांधकाम किती आहे, हे समोर येईल आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याचे समाधान मिळते. वर आयुक्त आणि सरकारही अशी अनधिकृत बांधकाम हुडकून काढत कारवाई केल्याबद्दल कौतुकाची ताप पाठीवर मारेल. आणि हो ही कारवाई करताना कुठल्याही राजकारण्यांचे, पुढाऱ्यांचे, मंत्र्यांचे तसेच आयुक्तांचे ऐकू नका.

कंगनाच्या एका बंगल्यावरील कारवाईने वांद्रे, खार पश्चिम भागातील ज्या सेलिब्रेटींच्या घरात घुसून तेथील अनधिकृत बांधकामांची पाहणी करण्यास प्रवेश नव्हता, तो मार्ग यामुळे मोकळा झालाय. आपल्याला ही कारवाई करण्यासाठी कुणा तक्रारींची गरज नाही. हिंमत असेल तर त्याच भागात ही ड्राईव्ह घेऊन दाखवाच. आयुक्तांनीही आपल्या सर्व विभागीय सहायक आयुक्तांना मुभा देत अशी मोहीम सर्वच विभागात राबवण्याचे निर्देश द्यावे. कारण या निमित्ताने तरी जे अनधिकृत बांधकामांना संरक्षण देत जी बजबजपुरी काही अधिकाऱ्यांनी कुणा ना कुणाची मर्जी राखण्यासाठी माजवली आहे, ती साफ करायलाच हवी. करोनाचे काळात अनधिकृत बांधकामांची वाळवी अधिकच पसरली आहे. ती आज साफ नाही केली तर अर्थव्यवस्थेलाही पोखरून टाकेल. तशी ही वाळवी आजची नसली तरी कोरोनाच्या काळात आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त हे विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून उपाययोजना राबवत असले, तरी त्यातील काही अधिकारी हे जाणीवपूर्वक अशा बांधकामांना अभय देत होते, हे दुर्लक्षित करून चालणार नाही.


Kangana Ranaut Mumbai Office: उच्च न्यायालयानं २२ सप्टेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली