शहराचं सोडा, महापालिका मुख्यालयातच पाणीटंचाई!

मुंबईकर पाणीटंचाईचा सामना करत असताना पालिका मुख्यालयातही पाणीटंचाई असल्याची बाब समोर आली आहे.

Mumbai
severe water scarcity crisis in the cities in thane
Water

मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची झळ बसू लागली असून नगरसेवकांचे न ऐकणार्‍या प्रशासनालाच आता स्वत:ची गरज भागवण्यासाठी टँकरची मदत घ्यावी लागत आहे. ज्या इमारतीतून आयुक्त आणि चार अतिरिक्त आयुक्त महापालिका प्रशासन चालवतात, त्या मुख्यालयालाच पाण्याची झळ बसू लागली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मुख्यालयालयाला दिवसाला दोन ते तीन पाण्याचे टँकर पुरवले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

टँकर पुरवतात पालिकेला पाणी!

पालिका मुख्यालयाच्या मुख्य आणि विस्तारीत अशा दोन इमारती असून तेथे विविध विभागांमध्ये हजारो कर्मचारी काम करतात. पालिकेने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये पाणीकपात केल्यापासून या दोन्ही इमारतींना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे ‘ए’ विभागातील फीलिंग पॉइंटवरून पालिकेच्याच टँकरमधून पाणीपुरवठा केला जात आहे. मागील तीन ते चार महिन्यांपासून टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असून रोज दोन ते तीन टँकर मागवावे लागत असल्याची माहिती पालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली. विशेष म्हणजे या भागाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या सुजाता सानप यांच्या तक्रारींची दखल न घेणार्‍या प्रशासनाचे आता यामुळे पितळ उघडे पडल्याचे स्पष्ट होत आहे.


हेही वाचा – मुंबईकरांनो पैसे वाचवा; तुमचं पाणी महागलं!

शहरात पाणीपट्टीमध्ये वाढ

दरम्यान, एकीकडे शहरात पाणीटंचाईची समस्या सुरू असतानाच दुसरीकडे महापालिकेने पाणीशुल्कामध्ये तब्बल अडीच टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकर अधिकच हवालदील झाला आहे. येत्या १६ जूनपासून हे वाढीव पाणीशुल्क लागू केले जाणार असून त्याद्वारे पालिकेच्या तिजोरीत तब्बल २८ कोटींचा महसूल जमा होणार आहे.