घरमुंबईभुजबळांना ‘रामटेक’ मिळाला आता खात्याबाबत उत्सुकता

भुजबळांना ‘रामटेक’ मिळाला आता खात्याबाबत उत्सुकता

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते छगन भुजबळ यांचा पहिल्याच टप्प्यात राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. भुजबळांना अपेक्षित ‘रामटेक’ निवासस्थान मिळाल्यानंतर आता त्यांना नेमके कोणते खाते मिळणार याविषयी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अखेरच्या क्षणापर्यंत अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर झुलत राहिलेली महाविकास आघाडीचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला. त्यानंतर राज्यात उध्दव ठाकरे सरकार विराजमान होणार असल्याचे निश्चित झाले आणि खाते वाटपाच्या हालचालींना वेग आला. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांच्या जोरबैठका अहोरात्र सुरु होत्या. नाट्यमय घडामोडींमध्ये अजित पवारांसोबत गेलेल्या नाशिक जिल्ह्यातील चार आमदारांना परत घेवून येण्यात भुजबळांनी महत्वाची भूमिका निभावली. दिल्ली जवळील गुडगाव येथील हॉटेलमध्ये मुक्कामी असलेले नाशिकचे आमदार पुन्हा मुंबईत परतले. यात भुजबळांनी आपल्या मोहोर्‍यांचा सचोटीने वापर करत आमदारांना आपल्या तंबूत परत बोलवले. त्यामुळे शरद पवार यांचा विश्वास वाढला आणि त्यांचे फलित म्हणून भुजबळांचा पहिल्याच टप्प्यात मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. यामागे अजून एक विशेष कारण सांगितले जाते, ते म्हणजे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विश्वासू नेत्यांमध्येही भुजबळांचा समावेश होतो.

निवडणुकीपूर्वी त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याच्या चर्चा अनेक दिवस रंगल्या होत्या. मात्र, भुजबळ यामुळे कोठेही विचलित झाल्याचे दिसून आले नाही. त्यांनी अगदी मुत्सद्दी राजकारण्याप्रमाणे निवडणूक लढवली आणि लाखांवर मताधिक्याने विजयी झाले. विरोधात बसण्याची वेळ आलेली असताना शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाचा सूर लावताच भुजबळ अलगद सेनेच्या गोटात सामील झाले. पक्षांतर केलेले नसले तरी, मंत्रीमंडळाच्या पहिल्या फळीत स्थान मिळवण्यात त्यांना यश मिळाले आहे. मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांच्या शपथविधी 28 नोव्हेंबर रोजी मोठ्या दिमाखात पार पडला. यात भुजबळांचा अग्रक्रम असल्याचे दिसून आले. यानंतर त्यांच्या आवडीचा रामटेक हे निवासस्थानदेखील मिळाले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांचे याच बंगल्यात वास्तव्य होते. गेल्या पाच वर्षात त्यांच्या आयुष्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यामुळे त्यांचे राजकारण संपल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु होती. मात्र, महाविकास आघाडीने त्यांना गतवैभव मिळवून दिले आहे. रामटेक तर मिळाले पण आता सार्वजनिक बांधकाम मिळणार की जलसंपदा खाते याविषयी तर्क-वितर्क लावले जात आहेत.

- Advertisement -

भुजबळ आदिवासी विकासमंत्री?
छगन भुजबळ यांना कोणते खाते मिळणार याविषयी कमालिची उत्सुकता असली तरी, कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सुरु झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रदीर्घ अनुभव असलेले नेते म्हणून भुजबळांचा कल याच खात्याकडे दिसत असला तरी, शिवसेनेच्या कोट्यात हे खाते गेले आहे. त्यामुळे याव्यतिरीक्त जलसंपदा किंवा आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांची वर्णी लागू शकते. आदिवासी विभागाला स्वतंत्र आर्थिक तरतूद असल्यामुळे काम करण्यास भरपूर वाव असल्याने हेच खाते स्विकारतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -