Friday, August 7, 2020
Mumbai
27.5 C
घर महामुंबई शहापूरमधील नागरी समस्या ठरणार कळीचा मुद्दा

शहापूरमधील नागरी समस्या ठरणार कळीचा मुद्दा

Mumbai

ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून ओळखला जाणारा शहापूर तालुका राजकीय पटलावर नेहमी चर्चेत राहिला आहे. डोंगराळ व आदिवासी बहुल असलेल्या या तालुक्यात अनेक नागरी समस्या आहेत. या आधी असलेले नेतृत्व नागरी समस्या सोडविण्यात अपयशी ठरल्याने आता येथील मतदारांना बदल हवा आहे. मात्र, पुन्हा दरोडा आणि बरोरा हे जुनेच उमेदवार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

नागरी समस्या सोडविण्यासाठी अपयशी ठरलेल्या या दोघांपैकी मतदार आता पुन्हा कोणाला संधी देतात, हे मात्र निवडणुकीतील निकालावर अवलंबून आहे, पण नागरी समस्यांचे हे कळीचे मुद्दे कोणाला मारक ठरतात? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघातील एकूण 2 लाख 48 हजार 708 मतदारांवर या उमेदवारांची मदार आहे. शहापूर तालुक्यातील ही निवडणूक रंगतदार होणार असून राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेली निवडणूक अटीतटीचीही ठरणार आहे.

यंदाच्या निकालानंतर राजकीय समीकरणे बदलतील असे वातावरण आहे. यापूर्वी येथून जनतेने निवडून दिलेल्या आमदारांना पाहिजे तसा विकास करता आला नाही. यामुळे शहापूर तालुक्याचा विकास हवा तसा झाला नाही. अशी नागरिकांची ओरड आजही आहे. आदिवासी तालुका असलेल्या शहापूर तालुक्यातील आजही अनेक नागरी समस्या आहेत. मुंबई सारख्या महानगरांची तहान भागविणार्‍या भातसा, तानसा, वैतरणा ही धरणे येथे असूनही पाणीटंचाईचा शाप आदिवासींच्या नशिबी कायम आहे.

ग्रामपंचायतीच्या अनेक पाणी योजना बंद अवस्थेत आहेत. यामुळे अनेक गावपाड्यात पाण्याची कमतरता आहे. रोजगार नसल्याने आदिवासींचे स्थलांतर वाढत आहे. येथे शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय झाले. मात्र, रुग्णालयात पुरेसे डॉक्टर नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बिघडलेली आहे. बहुतांश ग्रामीण रस्त्यांची निकृष्ट कामांमुळे दैन्यवस्था झाली आहे. शहापूर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. अनेक सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. या आणि अशा विविध समस्या जैसे थै आहेत.

सात उमेदवार रिंगणात
शहापूर विधानसभा निवडणुकीत शहापूर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 14 नामनिर्देशनपत्र दाखल केले असून यात दौलत भिका दरोडा ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) पांडुरंग महादू बरोरा (शिवसेना ), जगदीश गोंविद गिरा (अपक्ष), विष्णू बुधा ठोंबरे (भारतीय ट्रायबल पार्टी), रविंद्र मंगळु मराडे ( बहुजन समाज पार्टी ), कृष्णा चिंतू भवर (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ), हरिश्चंद्र बांगो खंडवी (वंचित बहुजन आघाडी) हे सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.