घरमुंबईघाटकोपरपाठोपाठ बोरिवलीचेही रेल्वे स्थानक साफ

घाटकोपरपाठोपाठ बोरिवलीचेही रेल्वे स्थानक साफ

Subscribe

फेरीवाल्यांना हटवले

रेल्वे स्थानकापासून 150 मीटर परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिल्यानंतर याविरोधात धडक कारवाई हाती घेतली आहे. घाटकोपर नंतर मंगळवारी बोरिवली रेल्वे स्थानकाजवळील फेरीवाल्यांना हटवले. या भागातील 1 हजार 885 फेरीवाल्यांना हटवून बोरिवली स्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्यात आला आहे.

बोरिवली रेल्वे स्टेशन लगतच्या पूर्व व पश्चिम परिसरातील रस्त्यांवरील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता महापालिकेच्या आर/मध्य विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांनी फेरीवाल्यांना हटवण्याची मोहीम हाती घेतली. या कारवाईत अनधिकृत भाजी विक्रेते, फळ विक्रेते, कपडे, कटलरी विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते यांना हटवण्यात आल्याची माहिती बिरादार यांनी दिली. १ हजार ८८५ अनधिकृत फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये ६८५ खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा समावेश होता. खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील ३२ गॅस सिलिंडर, १०२ स्टोव्ह तसेच शेगड्या जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

रेल्वे स्थानक परिसरातील या फेरीवाल्यांमुळे वाहतुकीवर परिणाम होतो. त्यामुळे मागाठाणे,दत्तपाडा,सुदाम नगर,काजूपाडा,गोराई,चारकोप,बोरसापाडा आदी भागातून येणारया नागरिकांना या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. आता फेरीवाल्यांना हटवण्यात आल्यामुळे नागरिकांना विनाअडथळा आता चालता येईल तसेच प्रवासही करता येणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकाजवळील फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेवून केली होती. त्याची दखल घेत आयुक्तांनी मासिक आढावा बैठकीत सर्व सहायक आयुक्तांना रेल्वे स्थानकाजवळील फेरीवाल्यांना हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सहायक आयुक्तांनी मोहीम हाती घेतली आहे. घाटकोपर आणि बोरीवलीमध्ये फेरीवाल्यांना हटवण्याची मोहिम हाती घेतली असली तरी दादर, चर्चगेट सारख्या मोठया स्थानकाजवळील फेरीवाल्यांना मोकळे रान असल्याचे दिसून येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -