घरमुंबईवरळी,धारावीकडे आयुक्तांचे लक्ष, कुर्ल्याकडे दुर्लक्ष

वरळी,धारावीकडे आयुक्तांचे लक्ष, कुर्ल्याकडे दुर्लक्ष

Subscribe

धारावीपेक्षा मोठी लोकवस्ती, भाभा रुग्णालयात फक्त ९० खाटांचीच व्यवस्था

कुर्ला ‘एल’ विभाग हा मुंबईतील सर्वांत मोठा आणि विस्तीर्ण तसेच बहुतांशी झोपडपट्टीचा दाटीवाटीने वसलेला विभाग आहे. परंतु या विभागात करोनाबाधित रुग्णांनी अडीच हजारांच्या पल्ला गाठलेला असून रुग्णालयात खाटा नाहीत म्हणून किंवा ऑक्सिजन आणि ‘आयसीयू’ची व्यवस्था झाली नाही म्हणून ते घरातच जीव सोडत आहेत. मात्र, महापालिका प्रशासन वरळी आणि धारावी पलिकडे पाहायला तयार नाही. महापालिका आयुक्तपदाची सुत्रे हाती घेणार्‍या इकबाल सिंह चहल यांनी धारावीला भेट दिल्यांनतर गोवंडीत दोन तास चालत तेथील परिस्थितीचा अंदाज घेतला. परंतु यापेक्षा जटील समस्या ही कुर्ला ‘एल’ विभागातील चांदिवली विधानसभा क्षेत्रात आहे. त्यामुळे आयुक्तांनी या कुर्ल्यातील साकीनाका, चांदिवली आदी ठिकाणी भेट देवून रुग्णांची नक्की काय परिस्थिती आहे, हे जाणून घेतले तर संपूर्ण मुंबईचे चित्र स्पष्ट होईल.

महापालिकेच्या ‘एल’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत कुर्ला नेहरु नगर आणि चांदिवली असे दोन विधानसभा क्षेत्र मोडत आहेत. मात्र, या दोन्ही विधानसभा क्षेत्रांमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या २३२१ एवढी झालेली आहे. तर आतापर्यंत ५१० रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. सुमारे १३० रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. यातील चांदिवली विधानसभा क्षेत्रात कुर्ला काजुपाडा,साकीनाका, चांदिवली आदी विभागात महापालिकेच्या नोंदीनुसार सुमारे १ हजार १५ रुग्ण करोनाबाधित आहेत. तर त्यातील ५५० रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर सुमारे ९० रुग्णांचे बळी गेले आहेत.

- Advertisement -

दाटीवाटीने वसलेल्या या वस्तींमध्ये नगरसेवकांची आणि समाजसेवकांसह महापालिकेच्या अधिकार्‍यांची झोपच उडाली आहे. बाधित रुग्ण आढळून आल्यानंतरही त्याला रुग्णवाहिका मिळत नाही. खाटा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे लोकांचे जीव जात आहेत. धारावीत शीव रुग्णालय शिवाय साई रुग्णालय , लाईफ केअर, आयुष, फॅमिली केअर, प्रभात नर्सिंग होम आदी ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जातात. परंतु धारावीपेक्षा मोठी झोपडपट्टी असलेल्या या संपूर्ण कुर्ल्याचा भार भाभा रुग्णालयावर असून त्याठिकाणी फक्त ९० खाटांची क्षमता आहे. त्यामुळे मुळात लोकवस्तीचा विचार करता प्रशासनाने याठिकाणी खाटांची क्षमता वाढवलेली असती तर विभागात खाटांची कमरता भासली नसतील. येथील रुग्णांना भाभा रुग्णालयात जागा नसल्यास सेव्हन हिल्स नाहीतर राजावाडी किंवा शीव रुग्णालयाचा रस्ता धरावा लागत आहे. या विभागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यावर त्यांना रुग्णालयात हलवण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. तोपर्यंत त्या व्यक्तीपासून याचा संसर्ग अधिक बळावतो,असे लोकांचे तसेच लोकप्रतिनिधींचेही म्हणणे आहे.

कुर्ला भाभा रुग्णालयात सध्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर उपयोगात असून त्यामध्ये ९० खाटांची व्यवस्था आहे. यामध्ये सुरुवातीला आयसीयूची व्यवस्था नव्हती,पण आता १७ खाटा आयसीयूच्या सुरु करण्यात येत असल्याचे एल विभागाचे सहायक आयुक्त मनिष वळंजू यांनी स्पष्ट केले. याशिवाय कोहिनूर, फौजिया आणि दिशा या खासगी रुग्णालयांमधील खाटा ताब्यात आल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंगच हीच प्रमुख समस्या असून सार्वजनिक आणि सामुहिक शौचालयांची स्वच्छता आणि सॅनिटायझेनची तशीच समस्या होती. परंतु आता खासगी स्वयंसेवी संस्थांची नेमणूक करून प्रत्येक शौचालय दिवसांतून सहा वेळा सॅनिटाईज केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

माझ्या प्रभागात आतापर्यंत ६० ते ६५ रुग्ण आढळून आले असून त्यातील २० पेक्षा अधिक रुग्ण बरे होवून घरी परतले आहे. या विभागातील रुग्णांना कुर्ला भाभा आणि सेव्हन हिल्सला नेले जाते. कोहिनूर रुग्णालयात आता १२५ खाटा कुर्ल्यातील रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
-अश्विनी अशोक माटेकर,नगरसेविका,शिवसेना.

माझ्या प्रभागात मुकंदराव आंबेडकर नगर येथेच सर्वात जास्त रुग्ण आहेत. आतापर्यंत संपूर्ण प्रभागात ८७ एकूण रुग्ण असून त्यातील काही रुग्ण बरे होत आहे. आतापर्यंत संशयित व ठोस अशाप्रकारे १५ ते २० कोविडमुळे रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. माझ्या विभागात कम्युनिटी क्लिनिक सुरु केले असून दरदिवशी २५० रुग्णांची तपासणी व उपचार केले जातात.
-किरण लांडगे, अपक्ष नगरसेवक, शिवसेना पुरस्कृत.

मोहिली व्हिलेज येथील सुभाष नगर, कुलकर्णी वाडी आदी ठिकाणी जास्त रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत विभागात ३० रुग्ण आढळून आले असून त्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर रुग्णालयात खाटा उपलब्ध नसल्याने त्यांना दोन-दोन दिवस नेले जात नाही.
– प्रकाश मोरे, नगरसेवक,भाजप.

प्रशासन केवळ वरळी आणि धारावीकडे लक्ष देत आहे. परंतु कुर्ला-साकीनाका, चांदिवली आदी भागांची अवस्था प्रचंड बिकट आहे. कुर्ला भाभा रुग्णालयात मृतदेह उचलण्यासाठी वॉर्डबॉय नाही. नातेवाईकांनाच हे काम करावे लागत आहे. त्यामुळे प्रशासन पूर्णपणे फेल ठरताना दिसत आहे.
-हरिष भांद्रिग्रे, नगरसेवक, भाजप.

एक प्रतिक्रिया

  1. इलेक्ट्रॉनिक मीडिया वर या बातम्या का येत नाहीत? आणि मुंबई महानगरपालिकेकडून असा दुजाभाव केला जात असेल तर तिकडचे लोकप्रतिनिधी काय करत आहेत?

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -