घरमुंबईगटनेत्यांच्या सभेत आयुक्त गैरहजर

गटनेत्यांच्या सभेत आयुक्त गैरहजर

Subscribe

सत्ताधारी शिवसेनेला जुमानत नाही

महापौरांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आयोजित करण्यात आलेली गटनेत्यांची सभा पुन्हा एकदा रद्द झाली. मात्र, ही सभा महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या गैरहजेरीमुळे रद्द करण्यात आली. महापालिका आयुक्तांनी वैयक्तिक कारणांमुळे गटनेत्यांच्या सभेला येण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे सर्व गटनेते उपस्थित असतानाही केवळ आयुक्तांच्या गैरहजेरीमुळेच गटनेत्यांची सभा पुन्हा एकदा पुढे ढकलावी लागली. गटनेत्यांची बैठक ही पूर्व नियोजित असतानाही आयुक्तांनी या सभेला गैरहजर राहत बेस्टवरील चर्चेलाच बगल देत महापौरांसह सत्ताधारी शिवसेनेलाही आपण जुमानत नसल्याचे अप्रत्यक्ष दाखवून दिले.

मुंबईत बेस्ट कामगारांनी पुकारलेल्या संपादरम्यान शिवसेनेने आपण संप मोडीत काढण्याचे आश्वासन देत ५०० बस गाड्या रस्त्यांवर उतरवू, असे सांगितले होते. पण, प्रत्यक्षात शिवसेनेला आणि त्यांच्या बेस्ट कामगार सेनेला एकही बस रस्त्यावर उतरवता आली नाही. त्यामुळे शिवसेनेची दहशत संपत चालली आहे. एकेकाळी बंद म्हटला म्हणजे शंभर टक्के बंद करण्याची धमक असणार्‍या शिवसेनेच्या शब्दांत आता दम राहिलेला नसल्याचे बेस्ट संपादरम्यान दिसून आले. त्यामुळे खुद्द महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनीही आता सत्ताधारी शिवसेनेचे तसेच महापौरांचे पाणी जोखल्याने, त्यांनी गटनेत्यांच्या सभेत उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली आहे.

- Advertisement -

अत्यंत महत्त्वाच्या बैठकीच्या कारणांमुळे आयुक्तांना कुठे जावे लागत असेल तरच ते गटनेत्यांच्या सभेत गैरहजर राहत असत. परंतु, शुक्रवारी केवळ घरगुती कारण देत आयुक्तांनी सभेला उपस्थित राहण्यास नकार दिला. सर्व गटनेते उपस्थित असताना केवळ आयुक्तांमुळे सभा रद्द करण्याची नामुष्की महापौरांवर ओढवली आहे. यापूर्वीची गटनेत्यांची सभा अन्य कारणामुळे रद्द झाली होती. त्यामुळे यापूर्वीचे कार्यक्रम पत्रिकेवरील विषय प्रलंबित आहेत. त्यात आता आणखी काही विषयांची भर पडली आहे.

पाहुणे आल्याचे कारण आयुक्तांनी दिले
गटनेत्यांच्या सभेला शिक्षण समिती, सुधार समिती व बेस्ट समिती अध्यक्ष गैरहजर होते. तसेच, महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दूरध्वनीवरून संदेश देऊन आपल्या घरी पाहुणे आल्यामुळे आज बैठकीला येऊ शकत नसल्याचे कळवले. त्यामुळे गटनेत्यांची सभा पुढे घेण्याचे निश्चित करण्यात आल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आपलं महानगरशी बोलताना स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -