कोरोनात चहा नको रे बाबा…

सत्ताधारी आणि विरोधकांचे चहापान रद्द

state government will pay the mla driver salary
विधानसभा

राज्यात कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाचा चहापानाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे नुकतेच झालेल्या निधनामुळे असलेला दुखवटा हे चहापान रद्द होण्याचे कारण दिले गेले आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने असलेल्या पायंड्यानुसार सत्ताधार्‍यांकडून विरोधकांना अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानासाठी आमंत्रित केले जाते; पण यंदा राष्ट्रीय दुखवटा असल्याने हा सत्ताधारी आणि विरोधकांमधील चहापानाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

ठाकरे सरकारच्या यंदाच्या पावसाळी अधिवेशनासाठी अतिशय मर्यादित कालावधी ठेवण्यात आला आहे. अधिवेशनाच्या काळात गर्दी टाळण्यासाठी तसेच सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवले जावे या हेतूनेच अनेक पद्धतीने खबरदारी घेण्यात येत आहे. यंदा कोरोनाच्या संकटामुळे अधिवेशनात प्रवेश करणार्‍या प्रत्येकाची कोरोना चाचणी केल्यानंतरच प्रवेश देण्याची अट विधिमंडळ कामकाज समितीने घेतलेल्या निर्णयानुसार ठेवण्यात आली आहे.

यंदा कोरोनाच्या संकटामुळे एरव्ही महिन्याहून अधिक काळ चालणारे पावसाळी अधिवेशनही अवघ्या दोन दिवसांच्या मर्यादित अशा वेळेत आटोपले जाणार आहे. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे ६ सप्टेंबर रोजी सर्व सदस्यांची कोविड-१९साठीची ‘आरटीपीसीआर’ तपासणी करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला होता. ज्या सदस्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह असलेल्या सदस्यांनाच सभागृहात प्रवेश दिला जाणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी सदस्यांची बसण्याची व्यवस्था आवश्यकतेप्रमाणे सभागृहाच्या प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीमध्येही करण्यात येणार आहे.

सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रत्येक सदस्याला सुरक्षा किट देण्यात येणार आहे. या किटमध्ये फेस शील्ड, मास्क, हॅण्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर आदी वस्तूंचा समावेश असेल. अधिवेशनाच्या तोंडावरच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यांना उपचारासाठी मुंबईतील घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे.