घरमुंबईमुंबईच्या डबेवाल्यांची कॉर्पोरेट वेबसाईट

मुंबईच्या डबेवाल्यांची कॉर्पोरेट वेबसाईट

Subscribe

मुंबईतील डबेवाल्यांची कॉर्पोरेट कंपनी लाँच केल्यानंतर आता २ वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. पण डबेवालेही आता डिजिटल स्वरूपात आपली नवी ओळख करू पाहत आहे. डबेवाले त्यांची कॉर्पोरेट ओळख जगाला दाखवण्यासाठी कॉर्पोरेट वेबसाईट सुरू करणार आहेत. शनिवारी या कॉर्पोरेट वेबसाईटचे लाँचिंग होणार आहे.

याआधी ७ सप्टेंबर २०१७ रोजी डबेवाला एंटरप्राईजेस प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करण्यात आली. आता या कॉर्पोरेट कंपनीच्या कामकाजाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. कंपनीच्या माध्यमातून डबेवाल्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा उद्देश ठेवून कंपनी सुरू झाली. डबेवाला एंटरप्राईजची स्थापना ही डबेवाल्यांच्या आर्थिक सुलभतेसाठी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आली.अनेक डबेवाल्यांना या माध्यमातून आतापर्यंत मदत मिळाली आहे. सुमारे १३० वर्षे जुना इतिहास असलेल्या डबेवाल्यांनी त्यांना येणार्‍या दैनंदिन अडीअडचणींवर मार्ग काढण्यासाठी या एंटरप्राईजची स्थापना केली आहे. मुंबईकरांच्या सेवेतील डबेवाल्यांना वैयक्तिक आयुष्यात आर्थिक दाखला, बँकेचे खाते, इनकम टॅक्स रिटर्न फाईल करता न येणे, कर्ज न उपलब्ध होणे, इन्शुरन्स न मिळणे, मेडिक्लेम कव्हरेज नसणे, गृहकर्ज न मिळणे तसेच कोणताही आर्थिक आधार न मिळणे यांसारख्या अडचणींचा सामना करावा लागतो.

- Advertisement -

याच सगळ्या समस्यांमधून वाट काढण्यासाठी डबेवाला एंटरप्राईजची स्थापना करण्यात आली आहे. आता कॉर्पोरेट कंपनीचा पुढचा टप्पा म्हणजे वेबसाईट असणार आहे. डबेवाल्यांच्या कॉर्पोरेट कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत डबेवाल्यांना वैयक्तिक आयुष्यात येणार्‍या अडचणींवर तोडगा काढून देण्यासाठी मदत करण्यात आली आहे. त्यामध्ये डबेवाल्यांना कामासाठीची पेमेंट स्लीप देणे, १० लाख रूपयांचा विमा काढून देणे, इनकम टॅक्स फाईलिंगपासून ते कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्यात आली आहे.

या दोन वर्षातील कामाचा आढावा आणि सादरीकरण हे वेबसाईटच्या निमित्ताने होईल. अनेकदा अनेक एनजीओ डबेवाल्यांच्या नावे वेबसाईट काढतात, पण काम करत नाहीत. पण आम्ही आधी डबेवाल्यांना मदत केली आहे आणि त्यानंतर आता आमचे डबेवाल्यांसाठीचे काम वेबसाईटच्या माध्यमातून जाहीर करणार आहोत, अशी माहिती एका पदाधिकार्‍याने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -