घरमुंबईआवडत्या कॉलेजचा आग्रह धरू नका

आवडत्या कॉलेजचा आग्रह धरू नका

Subscribe

बारावीच्या निकालानंतर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा प्रचंड गोंधळ उडतो. यामध्ये अनेकदा विद्यार्थी आपल्याला अमुकच कॉलेज हवे असल्याचा अट्टाहास धरतात, विद्यार्थ्यांच्या हट्टामुळे त्यांना प्रवेश मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नामांकित कॉलेजचा अट्टाहास न धरता आपला कल ओळखून प्रवेश घ्यावा, असा सल्ला मिठीबाई विद्यापीठाचे प्राचार्य राजपाल हांडे यांनी दिला.

प्रश्न : प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी?
प्रा. हांडे : निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी धडपड सुरू होती. पण त्यापूर्वी विद्यार्थ्यांनी आपल्याला कोठे जायचे आहे, आपला कल कोणत्या शाखेकडे आहे, हे ठरवणे गरजेचे आहे. आपला कल निश्चित झाल्यानंतर आपल्याला नामांकित कॉलेजच हवे असा अट्टाहास धरू नका. त्याऐवजी त्यांचा कल असलेला अभ्यासक्रम संबंधित कॉलेजमध्ये उत्तमरित्या शिकवला जातो का, याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

- Advertisement -

प्रश्न : विद्यार्थ्यांचा ओढा सध्या कोणत्या शाखेकडे अधिक आहे?
प्रा. हांडे : आमच्या कॉलेजमध्ये कॉमर्सबरोबर आर्ट्स शाखेमध्ये प्रवेश घेण्याच्या विद्यार्थ्यांचा अधिक कल दिसून येतो. कॉमर्सकडे विद्यार्थ्यांचा ओढा असला तरी बीएमएम, बीएमएस या जॉब ओरिएंटेड अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांकडून अधिक पसंती दिली जात आहे. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांचा कल सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमाकडेही दिसून येतो.

प्रश्न : स्वायत्त कॉलेजकडे विद्यार्थ्यांचा कल वाढण्याचे नेमके कारण काय?
प्रा. हांडे : स्वायत्त कॉलेजमधील कारभार हा पारदर्शक असतो. तसेच येथील अभ्यासक्रम जॉब ओरिएंटेड असण्याबरोबरच ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल स्वायत्त कॉलेजकडे वाढत आहे. स्वायत्त कॉलेजमधील कारभारात पारदर्शकता असण्याबरोबरच तंत्रज्ञानावर अधिक भर देण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेवर होऊन त्याचा निकालही जलद लागतो. आमच्या कॉलेजचा निकाल मेच्या दुसर्‍या आठवड्यातच लागला होता. निकाल लवकर लागणे हे विद्यार्थ्यांच्या फायद्याचे ठरत असल्याने विद्यार्थी स्वायत्त कॉलेजांना पसंती देत आहेत.

- Advertisement -

प्रश्न : मिठीबाई कॉलेजमध्ये कोणकोणते अभ्यासक्रम राबवण्यात येतात?
प्रा. हांडे : कॉलेजकडून विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवण्यात येतात. यामध्ये कार्पोरेट ग्रुमिंग अ‍ॅण्ड एटीक्वेटी वर्कशॉप, शॉर्ट टर्म फायनाशियल मार्केट कोर्स, एनआयएसएम-सिरीज- 11 : इक्विटी सेल्स सर्टिफिकेट इक्सामिनेशन, एनआयएसएम-सिरीज- 5बी : म्युचल फंड फाऊंडेशन सर्टिफिकेट, बायोटेक्नोलॉजी, क्लिनिकल बायोकेमिस्ट्री, फिलोसॉफी ऑफ हॉलिस्टिक वेल बिईंग याचबरोबर बीएमएस, बॅफ, बीएफएम, बीएमएम, बीबीआय हे अभ्यासक्रम चालवण्यात येत आहेत.

प्रश्न : नवीन कोणता अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे का?
प्रा. हांडे : मिठीबाई कॉलेजकडून विविध अभ्यासक्रम राबवण्यात येत असले तरी यावर्षी प्रथमच बी.कॉम ऑनर्स हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. मुंबईमध्ये अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करणारे मिठीबाई कॉलेज हे मुंबईमधील पहिलेच आहे. या अभ्यासक्रमासाठी सध्या 60 जागा आहेत. सीए व एमबीए करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. त्यांची गरज लक्षात घेऊनच हा अभ्यासक्रम बनवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगले व वेगळे देण्याकडे आमचा कल आहे. त्यातूनच हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना भविष्यात चांगला फायदा होणार आहे.

प्रश्न : प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण असते. तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल?
प्रा. हांडे : पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया दोन स्तरावर चालते. यामध्ये पहिल्या स्तरावर विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या वेबसाईटवर नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणीनंतर मिळणार्‍या पीआरएन नंबरच्या माध्यमातून कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी शुल्क भरायचे आहे. शुल्क भरल्यानंतर कॉलेजमध्ये निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल. निवड यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाण्याची गरज नाही. कॉलेजकडून ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन शुल्क भरण्याची सोयही करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे पालकांनी व विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता व्यवस्थित प्रक्रिया राबवावी.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -