घरमुंबईडोंबिवली रामनगर पोलीस आरोपीच्या पिंजर्‍यात !

डोंबिवली रामनगर पोलीस आरोपीच्या पिंजर्‍यात !

Subscribe

प्रथमेश ज्वेलर्सचा तपास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात !

सोन्याच्या बदल्यात जादा सोने आणि पैशांवर बँकेपेक्षा अधिक व्याज असे आमिष दाखवून सर्वसामान्य ग्राहकांना सुमारे पावणे तीन कोटी रुपयांना गंडा घालून पसार झालेला प्रथमेश ज्वेलर्सचा मालक अजितकुमार कोठारी याला तब्बल एक महिन्यानंतरही रामनगर पोलीस अटक करू शकलेले नाहीत. मात्र या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत एका सोनाराकडून १० लाखांच्या लाचेची मागणी करणारा तपास अधिकारी आणि सहाययक पोलीस निरीक्षक सुनील वाघ याच्यासह आणखी दोघेजण अ‍ॅण्टी करप्शनच्या जाळयात अडकले आहेत. त्यामुळे या १० लाखांमध्ये कोण- कोण वाटेकरी होते, असाही प्रश्न यानिमित्त उपस्थित होत असून, डोंबिवली रामनगर पोलीसच आरोपीच्या पिंजर्‍यात सापडले आहेत.

डोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सचा मालक अजितकुमार कोठारी याने सर्वसामान्यांची सुमारे २ कोटी ६७ लाख रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक केल्यानंतर कोठारी याने त्याचे दुकान बंद करून तो पसार झाला. दिवाळीच्या सुमारास हे प्रकरण घडले होते, मात्र अजूनही कोठारीला पोलीस अटक करू शकले नाहीत. तपास अधिकारी वाघ हे या गुन्ह्याचा तपास करीत असतानाच एका सोनाराचे नावही पुढे आले होते. वाघ याने त्याची चौकशी करीत त्याला गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली.

- Advertisement -

गुन्हा दाखल होऊ नये तसेच गोल्ड, ज्वेलरी मेकिंगचे पेपर, गुमास्ता लायसन्स आणि गाळ्याचा करारनामा ही कागदपत्रे परत मिळवण्यासाठी वाघ याने महेश पाटील नामक इसमामार्फत त्या सोनाराकडे १० लाखांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे घाबरलेल्या सोनाराने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार नोंदवली. अ‍ॅण्टी करप्शनने या प्रकरणाची तपासणी केल्यांनतर लाचखोरांनी पैशाची मागणी केल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी बुधवारी रात्री सापळा रचला. यावेळी एपीआय सुनील वाघ याच्यावतीने महेश पाटील आणि प्रकाश दर्जी हे दोघे लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाख रूपये रोख घेताना त्यांना रंगेहाथ पडण्यात आले. एपीआय वाघसह तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

….म्हणूनच अजितकुमार कोठारी मोकाट

प्रथमेश ज्वेलर्सच्या प्रकरणात तपास अधिकारी लाच प्रकरणात अडकल्याने पोलिसांच्या कार्यपध्दतीवरच संशय निर्माण झाला आहे. ज्वेलर्सचा मालक अजितकुमार कोठारी एक महिन्यांपासून पोलिसांच्या हाती लागत नाही की पोलिसांकडूनच त्याला अटक केली जात नाही ? असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. कोठारी याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो दुकान बंद करून पसार झाला. त्याने हा पैसा दुबई, राजस्थान आणि ठाणे जिल्ह्यातील रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्याची माहिती पोलीस तपासात उजेडात आली होती. अजितकुमार कोठारी याचे कुटुंब डोंबिवलीत असून तो एक महिना होऊनही पोलिसांच्या हाती लागत नसल्याने आता पोलीसच संशयाच्या भोवर्‍या सापडले आहेत. कोठारीची अटकपूर्व जामीन मिळण्यासाठीच धडपड सुरू असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. त्यामुळे त्याला वेळ मिळावा या हेतूने पोलिसांकडून त्याच्या अटकेत हयगय केली जात असल्याचे समजते.

- Advertisement -

पोलीस अधिकार्‍यांचा प्रशासनावर वचक नाही

अजितकुमार कोठारी याला अटक कशी होत नाही? त्याच्या मोबाईल कॉल रेकॉर्डची तपासणी करा आणि त्याला शोधून काढा असे सांगून अतिरिक्त आयुक्त प्रताप दिघावकर यांनी रामनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग पवार यांना खडसावले होते. नामचीन गुंड फरार झाल्यानंतर, त्यांनाही पोलीस अवघ्या काही दिवसांत अटक करतात. मात्र कोठारपर्यंत डोंबिवलीच्या पोलिसांचे हात का पोहचत नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कल्याणचे पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांचाही पोलीस प्रशासनावर वचक नसल्याचे यातून दिसून येत आहे.

अशी होती स्किम…

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोडवरील प्रथमेश ज्वेलर्सचे मालक अजितकुमार कोठारी यांनी सर्वसामान्यांसाठी एक स्कीम राबवली होती. जितके तोळे सोने गुंतवणूक कराल, त्या बदल्यात वर्षाला १ तोळा जादा सोने आणि पैशाची गुंतवणूक केल्यास बँकेपेक्षाही अधिक म्हणजे १४ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून अनेकांनी सोने आणि पैशाची गुंतवणूक केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत अनेकांना पैसे व सोने न मिळाल्याने ग्राहकांनी त्याच्या दुकानासमोर एकच गराडा केला होता. त्यातूनच ज्वेलर्सचे हे बिंग फुटले होते.

प्रथमेश ज्वेलर्सचे मालक अजितकुमार कोठारी याला अटक करण्यासाठी पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास यंत्रणा राबविली आहे. कोठारी यांच्या कुटुंबियांची, नातेवाईक व मित्रमंडळींची पोलिसांनी कसून चौकशी केली. कोठारी याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला असून त्यांच्या बँकेचे स्टेटमेंट मागविण्यात आले आहे. ज्वेलर्सचे दुकान उघडण्यासाठी कोर्टाकडे अर्ज केला आहे. मात्र अजून कोर्टाकडून परवानगी मिळालेली नाही. त्यातून अनेक गोष्टी उलगडू शकतील. पण काही भाग हा तपासाचा असल्याने सगळ्याच गोष्टी सांगता येणार नाही. तपास अधिकारी लाच प्रकरणात अडकले, मात्र या गोष्टी करणे चुकीचे आहे. आता हा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) नारायण जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
-विजयसिंह पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रामनगर पोलीस ठाणे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -