गोरेगाव येथे डंपर अपघात; एका महिलेचा मृत्यू

पती-पत्नी बाइकवरून जात असताना एका डंपरने जोरात धडक दिली. सध्या या डंपर चालकाला पोलिसांनी अटक केलं असून पत्नीचा या अपघात मृत्यू झाला आहे.

Mumbai
Dumper accident at goregaon in one woman death
गोरेगाव येथे डंपर अपघात; एका महिलेचा मृत्यू

गोरेगाव येथे डंपर अपघातात एका ५६ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. कलावती दशरथभाई पांचाळ असं या मृत महिलेचे नाव आहे. तिच्या मृत्यूप्रकरणी आरोपी महाराजा पेरुमल नाडर (३४) या डंपर चालकाला वनराई पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने जामिनावर सोडून दिलं आहे. हा अपघात सोमवारी दुपारी अडीच वाजता गोरेगाव येथील वीरवानी इंडस्ट्रीज समोरील वीटभट्टी, ओबेरॉय फ्लायओव्हर ब्रिजच्या येथे झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कलावती दशरथबाई पांचाळ ही महिला मालाड येथील दत्तमंदिर रोडवरील स्वामीनारायण नगरात राहते.

सोमवारी दुपारी ती तिचा पती दशरथभाई यांच्यासोबत जयप्रकाशनगर ते मालाड असा प्रवास करीत होती. ही बाईक ओबेरॉय फ्लायओव्हरजवळ येताच भरवेगात जाणार्‍या एका डंपरने त्यांच्या बाईकला जोरात धडक दिली. यावेळी मागे बसलेल्या कलावती या बाइकवरुन खाली पडल्या आणि डंपरच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्या गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच वनराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

जखमी झालेल्या कलावती यांना तातडीने ट्रॉमा केअर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथेच उपचार सुरु असताना त्यांचा रात्री साडे दहा वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी अपघाताची नोंद होताच आरोपी डंपर चालक महाराजा नाडरला पोलिसांनी अटक केली. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक गितेंद्र भावसार यांनी दुजोरा दिला आहे.