भ्रष्टाचारप्रकरणी परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी

भ्रष्टाचारप्रकरणी परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी प्रतिबंधक विभागाने परिवहन आयुक्तांकडे परवानगी मागितली आहे.

Mumbai
Investigation of Transport Department officials on corruption
भ्रष्टाचारप्रकरणी परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी

राज्य परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकारी विकास पांडकर, जितेंद्र पाटील, हेमांगिनी पाटील आणि संजय डोळे यांच्या विरोधात भ्रष्टाचारसंबंधित तक्रारी आल्या आहेत. या आलेल्या तक्रारींची लाचलुचपत प्रतिबंधक विभागास चौकशी करावयाची आहे. त्यासाठी परिवहन विभागाची अनुमती मिळण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी ठाणे विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांनी राज्य परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांच्याकडे एका लेखी पत्रान्वये मागणी केली आहे. त्यामुळे परिवहन विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.

परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे परिवहन कार्यालय हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनला असून या कार्यालयास दलालांचा नेहमीच गराडा पडलेला असतो. येथील परिवहन कामकाजासाठी सामान्य नागरीकांकडून अधिकारी चिरीमिरी घेतल्याशिवाय कामेच करीत नाहीत. तसेच कार्यालयात खाजगी व्यक्तीच्या सेवा वापरू नयेत या सदर शासनाचे आणि लोक आयुक्त यांचे आदेश असताना देखील ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात सर्रासपणे खाजगी व्यक्तीच्या सेवांचा वापर केला जात आहे. तसेच ठाणे आरटीओ कार्यालयात बोगस रिक्षा बॅच आणि बोगस परमिट प्रदान करण्याचे घोटाळे झाले आहेत.

त्याचप्रमाणे विकास पांडकर, जितेंद्र पाटील, हेमांगिनी पाटील आणि संजय डोळे हे ठाणे आरटीओ येथे कार्यरत असताना त्यांनी आणि त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे सेवा प्रवेश करताना तसेच वार्षिक स्वरूपात मत्ता आणि दायित्वे यांची विवरण पत्र सादर न करता अपसंपदा निर्माण केले आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय मानव हक्क मंचाचे अध्यक्ष शरद धुमाळ यांनी या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या लाचलुचपत विभागाचे पोलीस महासंचालक यांना निवेदन सादर केले होते. त्या निवेदनाची शासनाने गंभीर दखल घेऊन ठाणे विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांना लेखी पत्र पाठवून ठाणे आरटीओ कार्यालयाकडे कार्यरत असणाऱ्या तत्कालीन परिवहन अधिकारी विकास पांडकर , जितेंद्र पाटील, संजय डोळे आणि हेमांगिनी पाटील यांच्या विरूद्ध कारवाई करण्यासाठी मागणी केली आहे. त्यामुळे परिवहन विभागात प्रचंड खळबळ माजली असून राज्य परिवहन आयुक्त शेखर चन्ने या प्रकरणी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.


हेही वाचा – शिवस्मारकात कोट्यवधींचा भ्रष्टाचार