घरमुंबईआग डोंबिवलीची पाठ सोडेना!

आग डोंबिवलीची पाठ सोडेना!

Subscribe

मेट्रो केमिकल कंपनीला भीषण आग,शाळा सोडण्यात आल्या

एमआयडीसी परिसरातील मेट्रोपॉलिटन एक्सिकेम या रासायिनक कंपनीला मंगळवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने व प्रचंड धुराचे लोट पसरल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कंपनीच्या आजूबाजूचा परिसर रिकामा करून परिसरातील शाळांनाही सुट्टी देण्यात आली होती.

एमआयडीसी फेज २ मध्ये मेट्रोपेालिटन एक्सिकेम ही कंपनी आहे. सुरूवातीला आगीची तीव्रता कमी होती. मात्र कंपनीतील केमिकलच्या ड्रमचा एकापाठोपाठ स्फोट झाल्याने आगीची तीव्रता अधिकच वाढली. स्फोटाच्या आवाजामुळे आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली हेाती. त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाडया घटनास्थळी दाखल झाल्या, अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी अथवा कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. आगीच्या तीव्रतेमुळे कंपनी जवळचा डोंबिवली एमआयडीसी फेज २ मधील कंपन्या बंद करण्यात आल्या असून कामगारांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच जवळचा म्हात्रे पाडा परिसर खाली करण्यात आला आहे.

- Advertisement -

नजीकच्या शाळा रिकाम्या करून विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले. आजूबाजूच्या १५ किमी परिसरात धुराचे लेाट पसरले होते. त्यामुळे निवासी परिसरातील नागरिक भयभीत झाले. आगीमुळे इतर हानी होऊ नये म्हणून खबरदारी त्या परिसरातील रस्ता बंद करण्यात आला. काही दिवसांपूर्वी डेांबिवलीतील गुलाबी रस्त्यावरून रासायनिक कंपन्यातील प्रदूषणाचा विषय चव्हाटयावर आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गुलाबी रस्त्याची पाहणी करून अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांना निवासी क्षेत्रातून हलविण्यात येईल तसेच सुरक्षेचे नियम न पाळणा-या कंपन्याना टाळे ठोकण्यात येईल असा दम भरला होता. मात्र त्यातून कंपन्यांनी कोणताच धडा घेतलेला दिसून येत नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अजूनही समजू शकले नाही.

आगीची तीव्रता मोठी होती. अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते, मात्र हवेमुळे आग पसरत गेली. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. – रविंद्र चव्हाण, आमदार डोंबिवली

- Advertisement -

डोंबिवलीतील ज्या पाच केमिकल कंपन्या आहेत त्यातील ही एक कंपनी आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गुलाबी रस्त्याची पाहणी केली त्यावेळी ज्या कंपन्या सुरक्षा यंत्रणेचे पालन करणार नाहीत त्यांना टाळं लावण्यात येईल अशी सक्त ताकीद दिली आहे. तसेचे अतिधोकादायक कंपन्या रहिवास क्षेत्रातून हलविण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री स्वत: या प्रश्नावर गंभीर आहेत. त्यामुळे नक्कीच कारवाई होईल – डॉ श्रीकांत शिंदे, खासदार कल्याण

माहिती अधिकारात मिळालेल्या बातमीनुसार डोंबिवलीतील पाच अतिधोकादायक असलेल्या कंपनी पैकी मेट्रोपॉलिटिन एक्सिम लिमिटेड ही एक कंपनी आहे. सदर या धोकादायक कंपन्या स्थलांतर करा, अशी मागणी मुख्यमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून केली होती. मुख्यमंत्री महोदयांनी ही मागणी मान्य केली. परंतु काही राजकीय नेत्यांनी व कारखानदारांनी कामगार बेकार होतील, असे भयानक राजकारण केले आहे. डोंबिवलीच्या सुरक्षेसाठी सदर अतिधोकादायक पाच कंपन्या ताबडतोब स्थलांतरित करणे अत्यावश्यक आहे. – राजू नलावडे, स्थानिक नागरिक

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या भागाची पाहणी केली, त्यावेळी धोकादायक कंपन्यांना टाळे लावा असे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवली असून निष्काळजीपणा करणा-या अशा कंपन्यांना डोंबिवलीतून हाकलून लावा … राजेश कदम, मनसे उपाध्यक्ष 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -