दिवाळीच्या फराळाने भारावले परदेशी विद्यार्थी

दिवाळीच्या मेजवानीची भुरळ मुंबईत विविध कॉलेजांमध्ये शिक्षणाचे धडे घेत असणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांना पडली असून या चकली, चिवडा, लाडू आणि करंजीच्या मेजवानीने हे परदेशी विद्यार्थी तृप्त झाल्याचे चित्र मुंबईत पाहायला मिळाले.

Mumbai
diwali 2018
मुंबई विद्यापीठात दिवाळी फराळ

दिवाळी म्हटलं की चकली, करंजी, लाडू अशा फराळाची मेजवानी सर्वांचेच लक्ष वेधून घेते. पण या दिवाळीच्या मेजवानीची भुरळ मुंबईत विविध कॉलेजांमध्ये शिक्षणाचे धडे घेत असणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांना पडली असून या चकली, चिवडा, लाडू आणि करंजीच्या मेजवानीने हे परदेशी विद्यार्थी तृप्त झाल्याचे चित्र मुंबईत पाहायला मिळाले. दिवाळीच्या या फराळाबरोबरच मुंबईच्या कोळी गाण्यांवरही या विद्यार्थ्यांनी ठेता धरत जीवाची मुंबई केली. दिवाळी, फराळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या रांगोळीनेदेखील उपस्थित विद्यार्थ्यांची मनं जिंकत रंगाच्या या अदाकराने त्यांच्या मनावर वेगळीच भुरळ पाडल्याची कबुली यावेळी विद्यार्थ्यांकडून देण्यात आली.

मुंबई विद्यापीठाच्यावतीने आयोजित

समृद्ध भारतीय संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी तसेच आपली संस्कृती सातासमुद्रापार पोहोचविण्यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे परदेशी विद्यार्थ्यांसोबत दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने या दिपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात करण्यात आले. विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. राजेंद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्यात अनेक कॉलेजमधील आणि विद्यापीठातील परदेशी विद्यार्थी सहभागी झाले होते.

सांस्कृतिक कार्यक्रमही सादर 

साऊथ सुदान, नायजेरिया काँगो, व्हिएतनाम, भुतान, अफगाणिस्तान आणि युएई यांसह अनेक देशातून आलेल्या परदेशी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये मुंबई विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारीवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील यांनी केले होते. दिपोत्सव या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी शास्त्रीय संगीत, भक्तीपर गीते, गझल आणि पाश्चात्य गाणी सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तर परदेशी विद्यार्थ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून खास दिवाळी फराळाचा मनमुराद आनंद लुटला.

परदेशी विद्यार्थी झाले खुश

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना सर्वात जास्त भुरळ पाडली ती दिवाळी फराळाच्या पदार्थांची. चकली, करंजी, चिवडा आणि इतर पदार्थ हे आमच्यासाठी नवीन असल्याची प्रतिक्रिया यावेळी विद्यार्थ्यांनी दिली. हे पदार्थ आम्ही पहिल्यांदाच खात आहोत. पारंपरिक महत्व असलेल्या या पदार्थांबाबत फक्त ऐकले होते. आज त्याचा आस्वाद आमच्या नशीबी आला, या उत्सवाच्या निमित्ताने आम्हाला आमच्या कुटुंबाची आठवण करुन दिल्याची प्रांजळ कबुलीही यावेळी अनेक विद्यार्थांकडून देण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here