घरमुंबईएसटी अपघातात हात गमावलेल्या तरुणाची सरकारकडून उपेक्षा

एसटी अपघातात हात गमावलेल्या तरुणाची सरकारकडून उपेक्षा

Subscribe

रायगड अपघाताला एक महिना होत आला तरी अद्याप जखमींना मदत मिळालेली नाही. २८ एप्रिलला श्रीवर्धन येथून नालासोपारा येथे येणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात ६ ते ७ जण गंभीर जखमी झाले होते. या अपघातात सुनील गायकर यांना उजवा हात गमवावा लागला. तर त्यांच्या उजव्या पायात आधीच लोखंडी रॉड असल्याने पाय सुध्दा निकामी झाला आहे. सध्या गायकर यांच्यावर मुंबईतल्या केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात होऊन एक महिना होत आला तरी अद्याप त्यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही.

घरातील कर्ता व्यक्ती संकटात
सुनील गायकर यांचे कुटुंबिय सध्या चिंतेत आहेत. गायकर यांना पत्नी, तीन लहान मुली, एक लहान भाऊ, आई आणि वडील असा परिवार आहे. घरातील कर्त्या व्यक्तीवर संकट आल्याने घरखर्च चालवणे कठीण झाले आहे. घर चालवण्यासाठी आणि मुलींच्या शिक्षणासाठी खर्च येणार कुठुन असा प्रश्न सध्या गायकर कुटुंबियांना पडला आहे. तर गेल्या एक महिन्यापासून सुनील गायकर यांचा आयुष्याशी संघर्ष सुरू आहे. अपघातामध्ये गमावलेल्या उजव्या हाताच्या जागी कृत्रिम हात बसवण्यासाठी जवळपास साडेतीन लाखांची गरज आहे. पण तितका भार ते पेलू शकत नाहीत. सरकारकडून काही तरी मदत मिळेल याची अपेक्षा गायकर कुटुंबियांना आहे.

- Advertisement -

सरकारला पत्रव्यवहार करुन काहीच मदत नाही
अपघात झाल्यानंतर सुनील गायकर यांना उपचारासाठी पैशांची खूप गरज होती. त्यामुळे गावातील काही लोकांनी पुढाकार घेऊन पैसे जमवून जवळपास एक लाखांची मदत गायकर कुटुंबियांना केली. पण पुढील उपचारासाठी लागणाऱ्या खर्चासाठी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला. पण कोणतीच मदत मिळाली नाही किंवा आश्वासन सुद्धा मिळालं नाही, असं सुनील गायकर यांच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे. सुनीलच्या वडिलांचे वय झाले आहे. पण कुटुंबाचा डोलारा सांभाळण्यासाठी ते वॉचमन म्हणून सध्या काम करत आहेत.

सुनीलच्या पुढील उपचारासाठी पैसे नाहीत
“७ जणांचे कुटुंब पोसण्यासाठी हाताला मिळेल ते काम करून आमचे पोट भरण्यासाठी धडपडणारा माझा मुलगा गेल्या एक महिन्यापासून दवाखान्यात आहे. पण एसटीमध्ये अपघात होऊनही अजुनपर्यंत कोणतीच मदत मिळाली नाही. गावकऱ्यांच्या मदतीने सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पण यापुढे लागणारा खर्च आम्ही पेलू शकत नाही. त्यामुळे सरकारच्या मदतीची आम्ही वाट पाहत आहोत”, असं सुनिल गायकर यांची आई वनिता गायकर यांनी सांगितलं.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -