Mumbai Bridge Collapse : नाईट शिफ्ट बेतली जीवावर

Mumbai
Mumbai Bridge Collapse near CSMT railway station

सीएसएमटी पूल कोसळला. या पुलापासून जवळच असलेल्या जीटी रुग्णालयाच्या ३ स्टाफ नर्सेसचा या पूल दूर्घटनेत मृत्यू झाला आहे. यातील दोन नर्सेस रात्रपाळीसाठी रुग्णालयात येत होत्या आणि एक नर्स घरी जात होती. या तिघीही जीटी रुग्णालयात काम करत होत्या. अपूर्वा प्रभू , रंजना तांबे आणि भक्ती शिंदे अशी या तीन परिचारिकांची नावे आहेत. यापैकी दोघींचे मृतदेह जीटी रुग्णालयात तर एकीचा मृतदेह सेंट जॉर्ज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

मृतांमधील स्टाफ अपूर्वा प्रभू या ओटी विभागात कामाला होत्या, तर स्टाफ रंजना तांबे या ऑर्थो विभागात कामाला होत्या. दोन्ही रात्रपाळीकरिता कामाला येत होत्या, असं जीटी हॉस्पीटल मधील सर्व्हंट वनिता जामखंडे यांनी सांगितले. जामखंडे या दोघींच्या सहकर्मचारी आहेत. पण, अचानक ही घटना घडल्याने या तिन्ही परिचारिकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

या दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपुर्वा प्रभू (३५), रंजना तांबे (४०), झहिद सिराज खान (३२), भक्ती शिंदे (४०) आणि तपेंद्र सिंह (३५) अशी मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची नावे आहेत. तर ३६ जण जखमी असून त्यांच्यावर जी.टी. हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. घटनास्थळाला स्थानिक नगरसेविका सुजाता सानप, खासदार अरविंद सावंत, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

गिरीश महाजन यांनी या दुर्घटनेतील मृतांना पाच लाख तर जखमींना ५० हजारांची मदत दिली जाईल, असे सांगितले आहे. विरोधकांनी मात्र सरकारवर सडकून टीका केली आहे. एलफिन्स्टन ब्रिज पडल्यानंतर मुंबईतल्या सर्वच ब्रिजचे ऑडिट व्हावे, अशी मागणी विविध घटकातील लोक करत होते, मात्र पालिका, रेल्वे प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले म्हणूनच ही दुर्दैवी घटना घडली असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

Mumbai Bridge Collapse near CSMT railway station 1
या दुर्घटनेनंतर जखमींची विचारपूस करताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर

 

Mumbai Bridge Collapse near CSMT railway station 2
दक्षिण मुंबईचे खासदार अरविंत सावंत आणि स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी देखील रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here