घरमुंबईदिव्यांग मतदारांना केले जाणार होम लिफ्ट

दिव्यांग मतदारांना केले जाणार होम लिफ्ट

Subscribe

पहिल्यांदा ईव्हीएम ब्रेल लिपीत

राज्यातील सव्वादोन लाखांहून अधिक मतदारांना निवडणूक विभागाकडून होम लिफ्ट केले जाणार आहे. लोकशाही प्रक्रियेत दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या उद्देशाने यंदा सुलभ निवडणुका हे घोषवाक्य भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. अधिकाधिक दिव्यांग मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी आयोगाने अनेक पातळीवर पुढाकार घेतला आहे. घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत होम लिफ्ट हा पुढाकार त्याचाच एक भाग आहे. प्रत्येक निवडणुकीत व्हीव्हीआयपी मतदारांची जशी खास काळजी घेण्यात येते, तशीच काळजी या दिव्यांग मतदारांचीही घेण्यात येणार आहे.

संपूर्ण राज्यात २ लाख २४ हजार १६२ मतदार हे दिव्यांग मतदार आहेत. या सगळ्या मतदारांपर्यंत पोहचण्याची सुरूवात आयोगाकडून निवडणूक प्रक्रिया जाहीर होण्याआधीच करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग कल्याणासाठी कार्यरत दिव्यांग कल्याण आयुक्तालय आणि अशासकीय संस्थांमार्फत जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणीही करून घेण्यात आली आहे. प्रत्येक दिव्यांग मतदाराचा संपर्क क्रमांक असलेला डेटाबेस विभागाकडून तयार करण्यात येत आहे.

- Advertisement -

मतदानाच्या दिवशी आयोगाकडून मतदारांना संपर्क साधण्यात येणार आहे. घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत अशा दिव्यांग मतदारांना वाहन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रापासून ते घरापर्यंत पुन्हा पोहचवण्यासाठी विभागाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाणार आहे. दिव्यांग मतदारांसाठीच्या PwD या एप्लिकेशनच्या माध्यमातून दिव्यांग मतदारही होम लिफ्टसाठी नोंदणी करू शकतात. तसेच मतदान केंद्राच्या ठिकाणी व्हिल चेअरच्या विनंतीसाठीचा पर्यायही एप्लिकेशनवर देण्यात आलेला आहे. मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व्यवस्था तसेच दिव्यांग मतदारांची गरज लक्षात घेऊन योग्य रूंदीचा दरवाजा उभारण्यात येणार आहेत.

ब्रेल लिपीयुक्त ईव्हीएम
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच संपूर्ण भारतात ब्रेल लिपीचा वापर असलेले ईव्हीएम मशीन वापरण्यात येणार आहे. आतापर्यंत दृष्टीहीन असणार्‍या मतदारांसाठी एक मदतनीस मतदान केंद्रावर सोबत नेण्यासाठी आयोगाकडून परवानगी देण्यात येत असे. पण ब्रेल लिपीच्या वापरामुळे आता कोणत्याही मदतीशिवाय या दृष्टीहीन मतदारांनाही आपल मतदान गुप्त ठेवणे शक्य होईल. ईव्हीएम मशीनवर सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार तसेच त्यांचे निवडणूक चिन्ह हे पर्याय ब्रेल लिपीमध्ये देण्यात येणार आहेत. त्यामुळे दृष्टीहीन मतदारांना आपल मत इतर सर्वसामान्य मतदारांसारखच देण शक्य होईल. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण राज्यात २ लाख १५ हजार ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

अनेक एनजीओ दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. शिवाय निवडणूक आयोगही दिव्यांग मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. मतदारांना घरापासून ते मतदान केंद्रावर आणण्यासाठी वाहन व्यवस्था करण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून ओला उबर यासारखे वाहतूक क्षेत्रातील ऑपरेटर्स तसेच ऑटोरिक्षा युनियन यांच्यासोबत विभागाची चर्चा सुरू आहे. या मतदारांची विशेष काळजी घेण्यात येणार आहे.
– सत्यनारायण बजाज, उपजिल्हाधिकारी, मुंबई उपनगर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -