घरमुंबईमालाडकरांमध्ये संसर्ग पसरला कारण...

मालाडकरांमध्ये संसर्ग पसरला कारण…

Subscribe

दिंडोशी व मालाड पश्चिम या विधानसभा क्षेत्र असलेल्या महापालिकेच्या पी-उत्तर विभागात सध्या करोनाबाधित रुग्ण वाढीचा दर वाढताना दिसत आहे. पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचा वरळी या जी-दक्षिण विभागातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आता कमी होत असतानाच शहराचे पालकमंत्री अस्लम शेख प्रतिनिधीत्व करत असलेल्या मालाड पश्चिम विधानसक्षा क्षेत्रासह पी-उत्तर विभागात झपाट्याने रुग्ण वाढताना दिसत आहेत. मात्र, सुरुवातीच्या काळात वाढलेला जोर नियंत्रणात आणल्यानंतर काही प्रमाणात या विभागात करोनाबाधितांची संख्या स्थीर असताना पुन्हा रुग्ण वाढीचे प्रमाण वाढत आहे. मात्र, जे स्थलांतरीत कामगार तसेच अन्य कुटुंबे गावी जाण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बाहेर पडले त्यामुळे झालेल्या गर्दीतून या भागात पुन्हा एकदा संसर्ग झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

मालाडच्या पी- उत्तर विभाग रुग्णवाढीच्या यादीत १३ व्या क्रमांकावर आहे. सध्या या विभागात एकूण बाधित रुग्णांची संख्या १९०० वर पोहोचली आहे. तर यातील साडेचारशे रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या अजूनही १४०० च्या वर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रुग्ण वाढीचा सरासरी दर हा साडेतीन टक्के आहे. त्यातुलनेत या विभागात सध्या ७.४ टक्के एवढा रुग्णवाढीचा दर आहे. विशेष म्हणजे ९ एप्रिल रोजी पी-उत्तर विभागात रुग्ण संख्या ३८ होती आणि त्यावेळी २४ विभागांमध्ये हा विभाग ६ व्या क्रमांकावर होता. परंतु त्यानंतर येथील रुग्ण संख्या नियंत्रणात आणून १४ एप्रिल रोजी हा विभाग १३ व्या क्रमांकावर गेला. त्यावेळी या विभागात रुग्णांची संख्या ५८ होती. परंतु या विभागातील रुग्णवाढीचा दर वाढतच गेला असून ८ दिवसांमध्येच या विभागांमध्ये सुमारे ८०० रुग्णांची भर पडली आहे. म्हणजे सरासरी १०० रुग्ण मागील आठ ते दहा दिवसांपासून आढळून येत आहे.

- Advertisement -

पहिला रुग्ण आप्पा पाड्यात आढळून आल्यानंतर पुढे येथील परिस्थिती नियंत्रणात आणली गेली होती. परंतु परराज्यात जाण्यासाठी जेव्हापासून विशेष लोकल गाड्या सोडण्यात आल्या. त्यासाठी लागणारी वैद्यकीय प्रमाणपत्रे व इतर परवानगीसाठी परप्रांतियांनी डॉक्टर्ससह अन्य ठिकाणी अर्ज करण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे आज ज्या प्रकारे आप्पापाडा, कोकणीपाडा, संतोषनगर, मालवणी गेट क्रमांक सात याठिकाणी करोनाचा प्रार्दुभाव मोठ्याप्रमाणात दिसून येतो. नेमक्या याच भागांतून स्थलांतरीत कामगार आणि त्यांची कुटुंबे गावाला निघून गेली आहे. परंतु जोपर्यंत घरांमध्ये होते. तोपर्यंत सर्व ठिक होते. परंतु नंतर ती मंडळी अर्ज व परवानगीसाठी बाहेर पडले, त्यानंतरच या भागात रुग्ण आढळून येऊ लागले. असा रहिवाशांचा अंदाज आहे. त्यामुळे परप्रांतिय गावाला जाताना करोना इथेही पसरवून गेले की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सध्या कुरार आप्पापाडा, शिवाजीनगर-कोकणी पाडा, संतोष नगर, मालवणी गेट क्रमांक ७ आदी ठिकाणी जास्त रुग्ण आढळून येत आहेत. ३५ बाधित क्षेत्रांपैकी ५ मोकळे करण्यात आल्याने आता ३० बाधित क्षेत्रे आहेत. बहुतांशी विभाग झोपडपट्टी परिसर असल्याने दिवसाला सहा वेळा सार्वजनिक शौचालयांचे सॅनिटायझेशन केले जाते. लोकप्रतिनिधींचे सहकार्य तेवढेच असल्याने काम करणे सोपे जात आहे. अतिजोखमीच्या संपर्कातील संशयित रुग्णांसाठी २४०० खाटांची क्वारंटाईन क्षमता आहे.

- Advertisement -

ती आता ३ हजार पर्यंत वाढवली जात आहे. सध्या यामध्ये २२०० संशयित रुग्ण दाखल आहेत. तर लक्षणे नसलेल्या पण पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना आयसोलेशन करण्यासाठी १००० खाटांची क्षमता आहे. त्यात सध्या २०० रुग्ण असल्याचे पी- उत्तर विभागाचे सहायक आयुक्त संजोग कबरे यांनी स्पष्ट केले. मागील दोन महिन्यांपासून या विभागात रुग्णवाढीचे प्रमाण त्याप्रमाणे नियंत्रणात होते. परंतु मागील आठ दिवसांमध्ये या विभागात रुग्णवाढीचे प्रमाणे सरासरीपेक्षा अधिक झालेले आहे. परंतु येथील परिस्थिती तशी आटोक्यातच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पी-उत्तर विभागातील कोरोना रुग्णांची संख्या व क्रमवारी
*९ एप्रिल २०२० : ३८ (क्रमवारीत सहाव्या स्थानावर)
*१४ एप्रिल २०२० : ५८ (क्रमवारीत १३ व्या स्थानावर)
*२७ मे २०२० : १०४९ (क्रमवारीत १५व्या स्थानावर)
*३१ मे २०२० : १३८२ (क्रमवारीत १३ व्या स्थानावर)
*०४ जून २०२० : १८३९ (क्रमवारीत १३ व्या स्थानावर)

संतोष नगर, पिंपरी पाडा आदी परिसरांमध्ये सर्वाधिक करोना बाधित रुग्ण असून आतापर्यंत माझ्या प्रभागात ४० ते ४१ रुग्णांची संख्या पोहोचली आहे. रुग्णाला जर वेळीच ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर्सची सुविधा प्राप्त झाली तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जलद झाले असते. पण रुग्णांची वाढती संख्या पाहता, रुग्णालय, आरोग्य केद्रांमध्ये खाटांची कमतरता भासणे स्वाभाविकच आहे. शौचालयांचे सॅनिटायझेशन योग्यप्रकारे होत असून खासगी डॉक्टर्सना पीपीई किट तसेच सोसायट्यांना ऑक्सिमीटर व थर्मामीटर गनचे वाटप करण्यात येत आहे. आज माझ्या विभागातील ५० ते ५५ टक्के लोक गावी निघून गेले आहेत. त्यामुळे विभागावरील ताणही कमी झाला आहे.
– तुळशीराम शिंदे, स्थानिक नगरसेवक, शिवसेना पुरस्कृत अपक्ष

तसे पाहिल्यास माझ्या प्रभागात राठोडी आणि आझमी नगर सोडल्यास सर्व तसेच रुग्णच नाहीत. संपूर्ण प्रभागात २६ रुग्ण आहेत. हा प्रभाग संपूर्णत: झोपडपट्टीने व्यापलेला आहे. एकही इमारत नाही. धारावीसारखाच हा प्रभाग आहे. परंतु सुरुवातीपासून झोपडपट्टयांमधील सार्वजनिक शौचालयांमध्ये केले जाणारे सॅनिटायझेशन व लोकांमध्ये वारंवार करण्यात येणारी जनजागृती यामुळे या विभागात करोनाचा संसर्ग अधिक पसरण्याला रोखले आहे. पालकमंत्री अस्लम शेख आणि सहायक आयुक्त संजोग कबरे यांचे संपूर्ण मालाड परिसरावर बारीक लक्ष आहे. आपल्याकडे रुग्णालये कमी आहेत. त्यामुळे रुग्णांना जागा मिळत नाही ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही.
– विरेंद्र चौधरी, स्थानिक नगरसेवक, काँग्रेस

त्या तुलनेन या प्रभागात तेवढे रुग्ण नाहीत. काही प्रमाणात महेश्वर नगर, शिवशक्ती कॉलनीत रुग्ण आहेत. परंतु या भागात रुग्णवाहिका ही प्रमुख समस्या असून ज्याठिकाणी आयसोलेशन केले जाते, तिथे जागाच मिळत नाही. त्यामुळे नेस्को किंवा अन्य ठिकाणी आरोग्य केंद्र सुरु करताना प्रशासनाने प्रत्येक विभाग कार्यालयांसाठी खाटा राखीव ठेवल्यास रुग्णांना दाखल करणे सोपे जाईल. तसेच जास्तीत जास्त ऑक्सिजन रुपांतरीत खाटांची सुविधा अधिक केल्यास मोठा त्रास दूर होईल.
– धनश्री भरणकर, स्थानिक नगरसेविका, राष्ट्रवादी काँग्रेस

माझ्या विभागात आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ९० च्या लगबग पोहोचली आहे. भंडारवाडा, वडारपाडा, सोमवार बाजार, मालाड स्टेशन परिसर, मामलेतदार वाडी, लिबर्टी गार्डन परिसर, नेव्ही कॉलनी, मार्वे रोड परिसर आदी भागांमध्ये सॅनिटायझेशन होत असून शौचालयांमध्येही दैनंदिन सॅनिटायझेशन महापालिका व आमच्या कर्मचार्‍यांच्यावतीने केले जाते. प्रभागात रुग्णवाहिकेची प्रमुख समस्या असून ओमनी गाडी किंवा शाळेची बस कोरोना रुग्णाला नेण्यासाठी येते. पण संबंधित कर्मचारी प्रशिक्षित नसल्याने त्यांना पीपीई किट कसा घालावा हे माहित नाही आणि घातल्यानंतर तो नष्ट कसा करावा हेही माहित नाही. महापालिका व सरकारच्या गलिच्छ कारभाराचे हे उदाहरण आहे.
– योगिता कोळी, स्थानिक नगरसेविका, भाजप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -