घरमुंबईवांद्रे येथून करोनाचे विषाणू सांताक्रूझमधे स्थिरावले

वांद्रे येथून करोनाचे विषाणू सांताक्रूझमधे स्थिरावले

Subscribe

बेहरामपाडा-नवपाडा, भारतनगर करोनामुक्त, सांताक्रूझमध्ये परिस्थिती हाताबाहेर

वांद्रे पूर्व ते सांताक्रूझ पूर्व आदी भागांमध्ये करोनाचा हाहा:कार सुरू असला तरी वांद्रेतून हद्पार झालेला करोनाचा विषाणू सध्या सांताक्रूझमध्ये स्थिरावलेला आहे. त्यामुळे वांद्रे आणि खारच्या तुलनेत सध्या सांताक्रूझ पूर्व परिसरातील गावदेवी,आग्रीपाडा, डवरी नगर,वाकोला ब्रिज धोबीघाट परिसरात करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या विभागात वांद्रे पूर्व येथील बेहराम पाडा, नौपाडा, भारत नगर आदी सर्वात जटील अशा वस्तींमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाच्या अधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधींची झोप उडाली होती. परंतु प्रशासनाने सर्व लक्ष या ठिकाणी केंद्रीत केल्यामुळे सुदैवाने हे विभाग आता करोनामुक्त वस्तीकडे वाटचाल करत आहेत. परंतु दुसरीकडे सांताक्रूझ परिसरात वाढणार्‍या बाधित रुग्णांमुळे आणि त्यांच्या संपर्कातील लोकांना वेळीच क्वारंटाईन करता येत नसल्याने प्रशासनासह लोकप्रतिनिधीही हतबल ठरताना दिसत आहेत.

वांद्रे, पूर्व विधानसभा आणि कालिना विधानसभा क्षेत्र असलेल्या एच-पूर्व विभाग कार्यालयाच्या हद्दीत आतापर्यंत १७०० एवढे बाधित रुग्ण असून दिवसाला सरासरी ६० रुग्णांची भर पडत आहे. वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रात मोडणार्‍या वांद्रे येथील मातोश्रीच्या जवळील चहा विक्रेत्याला बाधा झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांचे अंगरक्षकांसह पोलिसांची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर बेहराम पाडा, नौपाडा तसेच भारत नगरमध्ये झपाट्याने बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या तिन्ही ठिकाणची लोकवस्ती पाहता, प्रशासनासमोर एक मोठे आव्हान होते. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि पोलिस आदींच्या मदतीने एच-पूर्व विभागाचे सहायक आयुक्त अशोक खैरनार आणि त्यांच्या टिमने यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. यासाठी विशेष म्हणजे ड्रोनचा वापर करत नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत सोशल डिस्टन्सिंगपासून परावृत्त केले. त्याचा चांगल्याप्रकारे परिणाम दिसून येत आहे.

- Advertisement -

३० हजार लोकवस्ती असलेल्या बेहरामपाड्यात १७ बाधित रुग्ण आणि सुमारे २० हजार लोकवस्ती असलेल्या नौपाडा येथे १२ बाधित रुग्ण आढळून होते. परंतु हे सर्व रुग्ण आता बरे होवून आले असून मागील १५ दिवसांमध्ये या दोन्ही ठिकाणी एकही रुग्ण आढळून आलेला नाही. एवढेच नाही तर भारत नगरमध्ये मागील काही दिवसांपासून एकही रुग्ण आढळून आलेला नाही. विशेष म्हणजे या तिन्ही वस्तींमध्ये स्थलांतरीत कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात राहत होता. परंतु अडकलेल्या आणि गावी जाणार्‍यांसाठी सरकारने रेल्वे गाड्या सुरू केल्याने या तिन्ही वस्त्यांमधील कामगार आपल्या गावी परतला आहे. त्यामुळे तिन्ही वस्त्यांमध्ये ५० टक्केे लोकसंख्या सध्या कमी झालेली आहे. त्याचाही परिणाम दिसून येत आहे.

बेहरामपाडा, नौपाडा येथे मागील १५ दिवसांमध्ये एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. बाधित रुग्ण बरे होऊन परतले आहेत. त्यातच आता ५० टक्केे कामगार गावी गेल्याने येथील लोकसंख्या निम्म्यावर आली आहे. प्रशासनाने योग्यप्रकारे नियोजन केल्यामुळेच या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणता आली.
-हालिम खान, नगरसेवक, शिवसेना.

- Advertisement -

माझ्या प्रभागात जयहिंद नगर, शेठ नगर, दिपकवाडी आदी बाधित रुग्ण आढळून आले आहेत. सामूहिक शौचालय हीच प्रमुख समस्या आहेत. यामुळे याचा संसर्ग अधिक होत आहे. त्यामुळे शौचालयांचे सॅनिटायझेशन, मेडिकल कॅम्प आदींवर भर दिला जात आहे. याबाबत लोकांमध्ये अधिक जनजागृती होण्याची गरज असून आज अनेक लोक घाबरुन हृदयविकाराने मरत आहेत.
-चंद्रशेखर वायंगणकर, अध्यक्ष, प्रभाग समिती, एच-पूर्व-एच-पश्चिम.

महापालिकेचे अधिकारी जीव ओतून काम करत आहेत. परंतु परिस्थिती एवढी वाढली की कुपर असो वा भाभा किंवा सेव्हन हिल्स आदींच्या खाटा एवढ्या भरल्या आहेत की रुग्णांना दाखल करताना अडचण येत आहे. परंतु आत बीकेसीचे केंद्र सुरु झाल्याने विभागाला मोठा दिलासा मिळणार आहे.
-दिनेश कुबल, नगरसेवक, शिवसेना.

माझ्या प्रभागात दरदिवशी २ ते ३ रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत ७० ते ८० रुग्ण आढळून आले असून ४ ते ६ जणांचा मृत्यू झाला आहे. आग्रीपाडा,डवरी नगर येथे बेशिस्त वागत रस्त्यांवर फिरत आहेत. याठिकाणी शौचालयांचे सॅनिटायझेन दत्तक वस्तींच्या संस्थेमार्फत नियमित केले जाते.
-सदा परब, अध्यक्ष,सुधार समिती.

माझ्या प्रभागात सध्या एकही रुग्ण नाही. या विभागात जे रुग्ण वाढत आहेत ते पोलिसांमुळेच.महापालिकेचे सहायक आयुक्त अशोक खैरे यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी व संपूर्ण टीम योग्यप्रकारे काम करत आहे.
-शेख मोहम्मद रफिक, नगरसेवक, काँग्रेस.

माझ्या प्रभागात नागरिक भाजीपाला खरेदीसह रस्त्यांवर गर्दी करत आहेत. पहिली केस जावळीपाडा येथे आढळून आली होती. काही दिवसांपूर्वी ग्रीन विहार हॉटेलच्या मागे ३२ जण एकाच घरात राहत होते. त्यातील दोघांची चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. परंतु उर्वरितांना सांगूनही त्वरीत क्वारंटाईन केले नव्हते.
-तुलिफ ब्रायन मिरांडा, नगरसेविका,काँग्रेस.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -