घरमुंबईविद्यार्थ्यांना इंटरमिजिएटचे वाढीव गुण मिळणे अशक्य

विद्यार्थ्यांना इंटरमिजिएटचे वाढीव गुण मिळणे अशक्य

Subscribe

विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता

विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच कला, क्रीडा क्षेत्राकडे वळले पाहिजे. अशा विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याची हमी खुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे वारंवार देतात. परंतु, गेल्यावर्षी इंटरमिजिएट कला परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव वेळेत शिक्षण मंडळाकडे सादर न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना हे वाढीव गुण मिळाले नाहीत. यावर्षीही इंटरमिजिएट ड्राईंग ग्रेड परीक्षेचा निकाल विलंबाने लागल्याने विद्यार्थ्यांचे प्रस्ताव बोर्डाकडे वेळेत पाठवणे शक्य नाही. त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळण्याची शक्यता संपुष्टात आली असून, विद्यार्थ्यांचे यावर्षीही नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याने आठवी, नववी किंवा दहावीमध्ये इंटरमिजिएटची परीक्षा दिली असल्यास त्याला वाढीव गुण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार सप्टेंबर 2018 मध्ये झालेल्या इंटरमिजिएट परीक्षेचा प्रस्ताव शाळांनी 20 जानेवारीपर्यंत बोर्डाकडे सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. परंतु, हा निकाल 15 जानेवारीला जाहीर झाला आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर तो पोस्टाने केंद्रांना पाठविण्यात येतो. त्यामुळे शाळांना अद्यापही तो मिळालेला नाही. तसेच, तो 20 जानेवारीपर्यंत शाळांना मिळणे अशक्य आहे. इंटरमिजिएट ड्राईंग ग्रेड परीक्षेचा निकालच उशिरा लागत असेल तर विद्यार्थ्यांचे प्रस्ताव बोर्डाच्या अंतिम तारखेपर्यंत कसे सादर करायचे, असा प्रश्न शाळांना पडला आहे. इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल दरवर्षीच उशिरा लागत असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे प्रस्ताव बोर्डाकडे पाठवणे शाळांना शक्य होत नाही. त्यामुळे दरवर्षी अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होत असते. निकाल उशिरा लागल्याने गेल्यावर्षी 25 ते 30 मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे प्रस्ताव पाठवता आले नसल्याच्या तक्रारी संघटनेकडे केल्या आहेत. दोन वर्षांमध्ये इंटरमिजिएट परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. परंतु, त्याचे वाढीव गुण त्यांना मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे व त्यांना परीक्षेचे गुण मिळावेत यासाठीही प्रस्ताव पाठवण्याची तारीख कायमची वाढवण्याची मागणी मुख्याध्यापक संघटनांकडून होत आहे.

- Advertisement -

यासंदर्भात मुंबई मुख्याध्यापक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी मुंबई विभागीय बोर्डाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांची भेट घेऊन शाळा व मुख्याध्यापकांना येणार्‍या समस्या व पालकांच्या गुणांसाठी वाढलेला ओढा व जागरुकता निदर्शनास आणून दिली. यावर विद्यार्थ्यांना बोर्ड सहाय्य करेल. आपल्या समस्या राज्य मंडळाकडे पाठवू, अंतिम निर्णय तेथे घेण्यात येईल, असे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शंकर पवार, सचिव प्रशांत रेडीज, रणजीत सुर्वे, हुस्नआरा खान, जयसिंग कदम, इस्माईल बागवान आदी उपस्थित होते.शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पालिकेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना चित्रकला काढण्याचे आवाहन केले. तसेच, त्यांना चित्रकलेचे गुणही मिळत असल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट ड्राईंग ग्रेड परीक्षेचे गुण कसे मिळणार नाहीत, याची पुरेपुरे काळजी घेण्यात येत असल्याचे दिसून येते.

राज्य कला संचालनालयाकडून इंटरमिजिएट ड्राईंग ग्रेड परीक्षा घेण्यात येतात. काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा या परीक्षेकडे कल वाढत आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जूनमध्ये लावण्यात येतो. पण, इंटरमिजिएट परीक्षेचा प्रस्ताव पाठवण्याची शिक्षण विभागाकडून घाई करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना हे गुण मिळण्यात अडचणी येऊन त्यांचे नुकसान होते, अशा तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत.
– प्रशांत रेडिज, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -