सावरकर, थोरात यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर

राज्य शासनाचा रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जयंत सावरकर आणि विनायक थोरात यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

Mumbai
jayant sawarkar
ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर

राज्य शासनामार्फत देण्यात येणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार हा ज्येष्ठ रंगकर्मी विनायक थोरात यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी सोमवार, ५ नोव्हेंबर रोजी या पुरस्काराची घोषणा केली आहे. रुपये ५ लाख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप असणार आहे.

विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समिती

सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीत सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालिका स्वाती काळे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षा कीर्ती शिलेदार तसेच श्रीमती फैय्याज, जनार्दन लवंगारे, रवींद्र लाखे, निर्मिती सावंत, अरुण नलावडे, राजन ताम्हाणे आणि डॉ. वंदना घांगुर्डे हे सदस्य आहेत.

सावरकर, थोरात यांचा अल्पपरिचय

जयंत सावरकर यांची वयाच्या विसाव्या वर्षापासून अभिनयाची कारकीर्द सुरु झाली. नाट्यसृष्टीमध्ये पदार्पण केल्यानंतर सुरुवातीची दहा वर्षे त्यांनी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम केले. त्यानंतर विजय तेंडूलकर लिखित माणूस नावाचे बेट या नाटकामध्ये प्रथमच सावरकर यांना प्रेक्षकांसमोर कला सादर करण्याची संधी मिळाली. जयंत सावरकर यांनी आकाशवाणी केंद्रातही काम केले होते. आचार्य अत्रे यांच्या सम्राट सिंह या नाटकात त्यांनी विदुषकाची भूमिका साकारली आणि ती प्रचंड गाजली होती. तर पंडित विनायक थोरात यांचे वडील रेल्वेत नोकरी करीत असताना अहमदनगर येथील दौंड येथे वास्तव होते. त्यांनी तबल्याचे शिक्षण सुरुवातीला वडिलांकडे नंतर यशवंतबुवा निकम यांच्याकडे शास्त्रोक्त शिक्षण घेतले.

यांनाही मिळाले पुरस्कार

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी प्रभाकर पणशीकर, विजया मेहता, भालचंद्र पेंढारकर, प्रा. मधुकर तोरडमल, सुलभा देशपांडे, सुधा करमरकर, आत्माराम भेंडे, अरुण काकडे, श्रीकांत मोघे, रामकृष्ण नायक, लीलाधर कांबळी आणि बाबा पार्सेकर यांना प्रदान करण्यात आले आहेत. तसेच संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी फैय्याज, प्रसाद सावकार, जयमाला शिलेदार, अरविंद पिळगावकर, रामदास कामत, कीर्ती शिलेदार, रजनी जोशी, चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर आणि निर्मला गोगटे यांना प्रदान करण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here