घरमुंबईके/पूर्व आणि पी/ उत्तर प्रभाग समिती सेनेकडे; काँग्रेसच्या मदतीने भाजपला दणका

के/पूर्व आणि पी/ उत्तर प्रभाग समिती सेनेकडे; काँग्रेसच्या मदतीने भाजपला दणका

Subscribe

काँग्रेसच्या सदस्यांनी शिवसेना उमेदवाराला मतदान केल्याने भाजपचे मनसुबे उधळले गेले आणि प्रथमच या दोन्ही प्रभाग समितीवर शिवसेनेचा झेंडा फडकला गेला.

दक्षिण मुंबईतील ’ए, बी व ई’ ही प्रभाग समिती काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेने भाजपच्या हातातून हिसकावून घेतल्यानंतर पुन्हा विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व या के-पूर्व व मालाड या पी- उत्तर प्रभाग समितीतही सेनेने भाजपला दणका दिला. काँग्रेसच्या सदस्यांनी शिवसेना उमेदवाराला मतदान केल्याने भाजपचे मनसुबे उधळले गेले आणि प्रथमच या दोन्ही प्रभाग समितीवर शिवसेनेचा झेंडा फडकला गेला.

मुंबई महानगरपालिकेच्या २०२०-२१ करिता १७ प्रभाग समित्यांमधील सहा प्रभाग समित्यांची निवडणूक बुधवारी पार पडल्यानंतर गुरुवारी आणखी ५ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. ‘के/पूर्व’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार प्रियांका प्रमोद सावंत आठ मते मिळवून विजयी झाल्या तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपाचे अभिजित गणपत सामंत यांना ५ मते मिळाली. याठिकणी काँग्रेसचे जगदीश कुट्टी, विनी डिसोझा, सुषमा राय आणि नितीन सलाग्रे हे चार नगरसेवक आहेत. त्यांनी सेनेच्या उमेदवाराला मतदान केले. सर्व १४ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. तर एक मत अवैध ठरले.

- Advertisement -

मालाडही सेनेच्या ताब्यात

पी/ उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदी सेनेच्या संगीता सुतार विजयी झाल्या. त्यांना १० मते पडली तर प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार दक्षा पटेल यांना ८ मते मिळाली. या प्रभागात सेनेचे ६, भाजपचे ८, काँग्रेसचे ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे १ असे १८ सदस्य आहेत. त्यामुळे सेनेच्या सुतार यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची चार मते पडल्याने मागील तीन वर्षें ज्या भाजपकडे ही प्रभाग समिती होती ती सेनेच्या ताब्यात गेली. भाजपच्या दक्षा पटेल यांना ८ मते मिळाली.

के / पश्चिमच्या प्रभाग समिती अध्यक्षपदी सुधा सिंह

‘ के/पश्चिम’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार सुधा शंभूनाथ सिंग या ७ मते मिळवून विजयी झाल्या तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे राजू श्रीपाद पेडणेकर यांना ६ मते मिळाली. १३ ही सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला.

- Advertisement -

गोरेगाव भाजपकडे

‘पी/दक्षिण’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे हर्ष भार्गव पटेल यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तिन्ही प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे पिठासीन अधिकारी म्हाणून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या होत्या. तर कुर्ला प्रभाग समितीत प्रतिस्पर्धी पक्षाने उमेदवारी अर्ज न भरल्याने येथील निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यामुळे सेनेच्या आकांक्षा शेट्ये यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांना पिठासीन अधिकारी उपमहापौर सुहास वाडकर यांनी विजयी घोषित केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -